News Flash

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘उत्सवातील गणपती’ नसतो – डॉ. सदानंद मोरे

साहित्य संमेलन झाले, चार दिवस मिरवून झाले आणि पेपरला बातम्या आल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे कोणी समजू नये...

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘उत्सवातील गणपती’ नसतो – डॉ. सदानंद मोरे
चिंचवडच्या एक दिवसीय संमेलनपूर्व साहित्य संमेलनात पं. नंदकिशोर कपोते यांनी सादर केलेले नृत्य व जुगलबंदीला रसिकांनी भरभरून दाद दिली.

मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘उत्सवातील गणपती’ नसतो, अध्यक्षपदी असणाऱ्या व्यक्तीवर त्याचे स्वरूप अवलंबून असते, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी चिंचवडला व्यक्त केले. साहित्य संमेलन झाले, चार दिवस मिरवून झाले आणि पेपरला बातम्या आल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे कोणी समजू नये, असे सूचक विधानही त्यांनी केले.
पिंपरीतील नियोजित साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील विविध संस्था, संघटनांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या ‘संमेलन पूर्व संमेलना’चे उद्घाटन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. माधवी वैद्य, सुनील महाजन, राजन लाखे, सचिन इटकर आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे उत्सवातील गणपती असतो, असा उल्लेख लोक करतात. मात्र तसे काही नसते. अध्यक्षपदावर कशाप्रकारची व्यक्ती असते, त्यावर अवलंबून असते. गेल्या वर्षी १० डिसेंबरला आपण अध्यक्षपदाची सूत्रे घेतली. वर्षभरात आपण २९१ सार्वजनिक कार्यक्रम केले. असे असेल तर अध्यक्ष गणपती वगैरे नसतो, हे मान्य करायला काही हरकत नाही. घुमानने दाखवून दिले की संमेलन संपले म्हणजे जबाबदारी संपली, असे होत नाही. पी. डी. पाटील यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली आहे, आपण सर्व जणही कटिबद्ध आहोत. सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले. आभार नितीन यादव यांनी मानले.
सगळे ‘पाटील’ शब्द पाळत नाहीत
सगळे पाटील दिलेले आश्वासन पाळत नाहीत. राजकारणातील ‘पाटील’ तर बिलकूल पाळत नाहीत, अशी टिपणी श्रीपाल सबनीस यांनी या वेळी केली. डॉ. पी. डी. पाटील तसे नाहीत. त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी साहित्यिक मेळावा घेण्याची सूचना आपण केली, त्यांनी तातडीने होकार दिला. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष अहंकारी असतो. मलाही पाहिजे तितक्या प्रमाणात अध्यक्षपदाचा अहंकार आहे, असेही विधान त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 3:34 am

Web Title: chairman ganesh festival sadanand more marathi sahity sammelan
टॅग : Ganesh Festival
Next Stories
1 सहकार खात्याच्या समिती अध्यक्षपदी बाळासाहेब अनास्कर यांची नियुक्ती
2 लोणावळ्यात वधूपक्षाच्या खोलीतून पावणेसतरा लाखांचे दागिने लंपास
3 उपमहापौर आबा बागूल यांच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
Just Now!
X