News Flash

अकरावी व्यावसायिक शिक्षणाचा नवा अभ्यासक्रम यावर्षीपासूनच

व्यावसायिक शिक्षणाचा (एमसीव्हीसी) अभ्यासक्रम अखेर आता बदलणार असून यावर्षीपासूनच नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार अाहे.

| August 2, 2015 03:13 am

गेली दोन वर्षे बदलणार अशी चर्चा असलेला व्यावसायिक शिक्षणाचा (एमसीव्हीसी) अभ्यासक्रम अखेर आता बदलणार असून यावर्षीपासूनच नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याचे, व्यावसायिक शिक्षण संचालक ज. द भुतांगे यांनी सांगितले.
गेली दोन वर्षे व्यावसायिक शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलणार म्हणून चर्चेत आहे. मात्र, कधी अभ्यासक्रम मंडळाची मान्यता नाही, तर कधी पुस्तके तयार होतील याची खात्री नाही, यांमुळे हा अभ्यासक्रम प्रत्यक्षात लागू झाला नाही. मात्र, आता अखेरीस यावर्षीपासून नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. बदललेल्या तंत्रज्ञानानुसार नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम मान्यतेसाठी प्रस्तावित होता. यावर्षीपासून हा अभ्यासक्रम लागू करण्यात येऊ नये, अशी मागणीही काही संघटनांकडून आणि शिक्षकांकडून करण्यात येत होती. अभ्यासक्रम लागू करण्याबाबत शासकीय स्तरावर नुकतीच बैठकही घेण्यात आली होती. त्या वेळी यावर्षीपासूनच नवा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा अधिकृत निर्णयही जाहीर होईल, अशी माहिती भुतांगे यांनी दिली. या अभ्यासक्रमासाठी राज्यातील साधारण ५० ते ६० हजार विद्यार्थी प्रवेश घेतात.
नवा अभ्यासक्रम लागू झाला तरीही विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळणार का याबाबत अद्यापही साशंकता आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून तयार करण्यात येतात. मात्र, अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर या पुस्तकांचे काम पूर्ण होऊन ती विद्यार्थ्यांच्या हाती कधी मिळणार याबाबत अद्यापही अनिश्चितताच आहे.
याबाबत भुतांगे म्हणाले, ‘अभ्यासक्रमाबाबत उपस्थित केलेल्या शंकांचे बैठकीत निरसन करण्यात आले. यावर्षीपासूनच नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकेही तयार आहेत. त्याची छपाईही तातडीने करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळू शकतील. तोपर्यंत शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यात आलेली आहे. त्यांचे प्रशिक्षणही सुरू आहे. त्यामुळे पुस्तके हातात येईपर्यंत संदर्भ पुस्तकांवरून अभ्यास करता येऊ शकतो.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 3:13 am

Web Title: changed syllabus of mcvc from this year only
Next Stories
1 शहीद जवानाच्या पत्नीला शासनाने हिरावून घेतलेली जमीन परत मिळाली
2 स्मार्ट सिटीच्या सूचनांसाठी ऑनलाइन मतदान
3 सेवा न देणाऱ्या कंपनीला एक लाख व ३० हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश
Just Now!
X