देशातील टाळेबंदी दोन आठवडय़ांनी वाढवण्यात आल्यामुळे सनदी लेखापाल आणि कं पनी सचिव या अभ्यासक्रमांच्या जूनमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार असून, त्याबाबतची घोषणा इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (आयसीएसआय) परिपत्रकाद्वारे केली आहे.

सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या परीक्षा २९ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान घेणार असल्याचे आयसीएआयने जाहीर केले आहे. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीर विद्यार्थी हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर मेमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करून १९ जून ते ४ जुलैदरम्यान परीक्षा होणार असल्याचे आयसीएआयकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता केंद्र सरकारने टाळेबंदीचा कालावधी दोन आठवडय़ांनी वाढवल्यानंतर परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता २९ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार असल्याचे आयसीएआयचे अतिरिक्त सचिव एस. के . गर्ग यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. परीक्षेची अधिक माहिती आयसीएसआयच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

तर कंपनी सचिव अभ्यासक्रमाची १ ते १० जूनदरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता त्या ६ जुलैपासून सुरू होणार असल्याचे आयसीएसआयने स्पष्ट के ले आहे. तसेच पोस्ट मेंबर क्वालिफिकेशन (पीएमक्यू) परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संस्थेच्या वेबसाइटवर लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे संस्थेचे सचिव अशोक कुमार दीक्षित यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. परीक्षेची अधिक माहिती आयसीएसआयच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

सनदी लेखापाल अभ्यासक्रम

२९ जुलै ते १६ ऑगस्ट

कंपनी सचिव अभ्यासक्रम

६ जुलैपासून