नऱ्हे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात असलेल्या प्राध्यापकाची इंटरनेट बँकिंगद्वारे फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्य़ात खात्यावरील पैसे काढून घेण्याअगोदर मोबाईल सीमकार्ड बंद केल्याचेही उघडकीस आले आहे. सायबर शाखेच्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
संदीप मनोहर चवरे (वय ४१, रा. अतुलनगर वारजे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चवरे हे नऱ्हे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम  करतात. त्यांचा पगार सातारा रस्त्यावरील पंजाब नॅशनल बँकेत जमा होतो. ते सर्व व्यवहार इंटरनेट बँकिंगद्वारे करतात. १५ सप्टेंबर रोजी चवरे यांनी एटीएममधून पैसे काढल्यानंतर खात्यावर रक्कम कमी झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी अधिक माहिती घेतली असता ११ आणि १२ सप्टेंबर रोजी खात्यातून सात वेळा चार लाख १६ हजार रुपये काढून घेतल्याचे आढळले. त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार करण्याचा सातत्याने प्रयत्न केला, मात्र फोन लागला नाही. पैसे काढून घेण्याच्या अगोदर आरोपींनी चवरे यांच्या मोबाईलचे सीमकार्ड बंद केले होते. ११ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून त्यांचे सीमकार्ड बंद झाले. त्याबाबत संबंधित कंपनीकडे तक्रार केल्यानंतर सीमकार्ड खराब झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टेकाळे करत आहेत.