‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटातील बालकलाकार आर्या घारने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी अंध मुलांसोबत वाढदिवस साजरा करत असतानाच बालवयात तिने एक मोठा निर्णय घेतला. मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची सर्व प्रक्रिया तिने आपल्या नवव्या बर्थडेला पूर्ण केली. यासंदर्भात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील पत्र लिहिले आहे. यात तिने नेत्रदानाविषयी जनजागृती करावी, अशी विनंती मोदींना केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील बालकलाकार आर्याने बुधवारी भोसरी येथील अंध शाळेत वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे नेत्रहिन विद्यार्थ्यांसमोर केक कापत असताना तिने डोळ्यांवर काळी पट्टी बांधली होती. विद्यार्थी तिला डोळ्यांनी पाहू शकत नसले, तरी तिच्या उपस्थितीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. आर्याने ‘देऊळ बंद’, ‘पोश्टर गर्ल’, ‘माय इंडिया’ अशा मराठी चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं आहे. एवढेच नव्हे तर ती लवकरच ‘अबक’ या हिंदी चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर्या ही अवघ्या नऊ वर्षांची आहे. तिचे विचार हे मोठ्यांना जागृत करणारे असेच आहेत. त्रदान करण्याविषयी नागरिकांना संबोधित करावे, असे पत्र देखील आर्याने मोदींना लिहिले आहे.

श्रीलंकेसारखा छोटा देश हा पन्नास देशांना नेत्रदान करू शकतो तर आपण का करू शकत नाही? असा प्रश्न उपस्थित करत आर्याने सर्वांनी नेत्रदान करावे, असे आवाहन केलं. गेल्या तिन वर्षांपासून ती अंधांच्या व्यथा जाणून घेत त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करत आहे. आर्याला अंध व्यक्तींसाठी खूप काही करण्याची इच्छा आहे.