चिंचवडच्या चापेकर बंधूंचे योगदान लक्षात घेता चिंचवडचे नामकरण ‘चापेकरनगर’ करायला हवे, असे मत भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी व्यक्त केले. इतर संतांच्या पालखी सोहळ्याप्रमाणे पंढरपूरसाठी मोरया गोसावी पालखी सोहळा निघावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि पिंपरी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले, या वेळी उत्पात बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र देव, नगरसेवक संदीप चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक राजू गोलांडे आदी उपस्थित होते.
उत्पात म्हणाले,‘‘संतांचे जे जीवन असते ते पाहताना तो काळ पहायचा असतो, त्यास आताचे निकष लावायचे नसतात. मोरया गोसावी यांची गणेशभक्ती असाधारण होती.’’  डॉ. मोरे म्हणाले,‘‘ काळ हा माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे भक्तिमार्गाला काळाबरोबर ठेवायला हवे. मंदिर हे पूर्वी केंद्रस्थानी होते. आजही त्या माध्यमातून चांगली समाजोपयोगी कामे उभी करणे शक्य आहे. नवनवीन सांप्रदाय पुढे येतात, कारण त्यांनी लोकांची नाडी ओळखलेली असते म्हणूनच कालानुरूप परीक्षण घेत बदल स्वीकारायला हवेत.’’