पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाचे विसरलेले पाकीट केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने परत करुन प्रामाणिकपणाची प्रचिती दिली.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर सोमवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी अकराच्या सुमारास विमानाने दिल्लीला निघाले होते. विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी करण्यात येते. खर्डेकर यांनी कोटातील पाकीट आणि कोट एका ट्रेमध्ये ठेवला. त्यानंतर गडबडीत खर्डेकर यांच्याकडून पाकीट गहाळ झाले. पाकिटात वीस हजारांची रोकड, एटीएम कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड असा मुद्देमाल होता. खर्डेकर विमानाने दिल्लीत पोचल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी वैभव पोमण, जयंत येरवडेकर यांना या घटनेची माहिती दिली. येरवडेकर आणि पोमण यांनी विमानतळावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास विमानतळावरील अधिकाऱ्यांनी संपर्क साधला आणि ओळख पटवून पाकीट घेऊन जा, असा निरोप खर्डेकर यांना दिला.

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास खर्डेकर विमानाने पुण्यात पोहोचले. माझे पाकीट जवानांनी परत केले. त्यांनी तेथील नोंदवहीत पाकिटातील मुद्देमाल नोंदवून ठेवला होता, असे खर्डेकर यांनी सांगितले.

खर्डेकर यांनी बुधवारी सकाळी विमानतळ व्यवस्थापक अनिल ठाकूर यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आभार मानले.

विमानतळावर गहाळ झालेल्या वस्तू जवानांना सापडतात. मूळ मालक शोधण्यासाठी प्रयत्न केले जातात. विमानतळावर गहाळ झालेल्या ८० टक्के वस्तू प्रवाशांना परत केल्या जातात. ज्या वस्तूंचे मालक सापडत नाहीत, त्या वस्तू सरकारजमा केल्या जातात, असे ठाकूर यांनी खर्डेकर यांना सांगितले. खर्डेकर यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार यांचे आभार मानले.

एक लाखाची रोकड पोलिसांकडे जमा

गंज पेठ भागात एक लाखाची रोकड असलेली बॅग ‘वुई फॉर ऑल ट्रस्ट’चे सचिव चेतन शर्मा यांना सापडली. शर्मा यांनी ही रोकड पोलिसांकडे जमा करुन प्रामाणिकपणाची प्रचिती दिली. रामोशी गेट पोलीस चौकीचे सहायक निरीक्षक मुजावर, उपनिरीक्षक गावीत यांच्याकडे शर्मा यांनी रोकड असलेली बॅग जमा केली. सामाजिक कार्यकर्ते आय.टी. शेख, मोहसीन शेख, अक्रम शेख, विकास भांबुरे, रमेश त्रिवेदी, अक्रम शेख, बबलू सय्यद या वेळी उपस्थित होते.