शिकाऊ वाहन परवान्याच्या मुदतीत नियमबाह्य़ कपात

वाहन चालविण्याच्या शिकाऊ (लर्निग) परवान्याची मुदत सहा महिने असते. या मुदतीत पक्क्य़ा परवान्यासाठी चाचणी देता येते, असा नियम असताना सध्या शिकाऊ परवाना काढल्यापासून चार महिन्यांनंतर पक्क्य़ा परवान्याच्या चाचणीसाठी पूर्वनियोजित वेळ दिली जात नाही. त्यामुळे शिकाऊ परवान्याच्या मुदतीत नियमबाह्य दोन महिन्यांची कपात करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्याचप्रमाणे पक्क्य़ा परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर चाचणी तीन महिन्यांनी असली, तरी शुल्क भरण्यासाठी ४८ तासांचीच मुदत देण्यात येत असल्याने केंद्रीय परिवहन विभागाच्या या ऑनलाइन जाचामुळे नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत.

केंद्रीय परिवहन विभागाच्या ‘सारथी ४’ या प्रणालीद्वारे सध्या राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे ऑनलाइन करण्यात येत आहेत. प्रणालीतील त्रुटी आणि वेगाच्या अभावाने नागरिकांना सातत्याने गैरसोय होत असतानाच काही अटींमुळेही नागरिकांना सध्या नव्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने या प्रकाराला तीव्र आक्षेप घेतला आहे. शिकाऊ परवान्याची मुदत संपल्यानंतर संबंधिताला पक्क्य़ा परवान्यासाठी पूर्वनियोजित वेळ मिळाल्यास संबंधिताची चाचणी सहाव्या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेण्याबाबत परिवहन आयुक्तांनी मागेच परिपत्रक काढले आहे. त्यामुळे चार महिन्यांनंतर पक्क्य़ा परवान्यासाठी पूर्वनियोजित वेळ न देणे नियमबाह्य़ असल्याचे मत असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी व्यक्त केले.

पक्क्य़ा परवान्याची चाचणी देण्यासाठी पूर्वनियोजित वेळ मागितल्यास ती एक ते तीन महिन्यांनंतरची दिली जाते. शुल्क मात्र ४८ तासांत भरण्याचा संदेश पाठविला जातो. अन्यथा, पूर्वनियोजित वेळ रद्द करण्याचा इशाराही दिला जातो. प्रत्यक्ष चाचणीच्या दिवशी संबंधित अर्जदाराला उपस्थित राहणे शक्य न झाल्यास त्याचे पैसे बुडतात. त्यामुळे चाचणीपूर्वी एक-दोन दिवस आधी शुल्क भरण्याची मुदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

होतेय काय? : वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना दिल्यानंतर तो सहा महिने ग्राह्य़ असतो. ही मुदत संपण्यापूर्वी पक्क्य़ा परवान्यासाठी चाचणी द्यावी लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिकाऊ वाहन परवाना मिळालेल्या नागरिकांना चार महिन्यांनंतरच पक्क्य़ा वाहन चाचणीच्या प्रक्रियेबाबत संदेश येतो आहे. चार महिन्यांनंतर मात्र संबंधिताला पक्क्य़ा वाहन परवान्यासाठी पूर्वनियोजित वेळ दिली जात नाही. त्यातून अनेकांना पुन्हा शिकाऊ परवान्याची प्रक्रिया करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो आहे.

शिकाऊ परवान्याची सहा महिन्यांची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्जदाराला पक्क्य़ा परवान्याच्या चाचणीसाठी पूर्वनियोजित वेळ मिळाली पाहिजे. मात्र, सध्या या नियमाची पायमल्ली होत आहे. पक्क्य़ा परवान्याच्या चाचणीसाठी तीन महिन्यांनंतरची पूर्वनियोजित वेळ मिळत असताना ४८ तासांत शुल्काची वसुलीही चुकीची आहे. केंद्रीय परिवहन विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात.

– राजू घाटोळे, राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, अध्यक्ष