राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस लवकरच नव्या रूपात दिसणार आहेत. आत्तापर्यंत गायिका म्हणून ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक पैलू अनुभवता येणार आहे. पुणे येथील एका फॅशन इन्स्टिट्यूटच्या मॉडेल म्हणून अमृता फडणवीस अमेरिकेत होणाऱ्या न्यूयॉर्क फॅशन वीकच्या रॅम्पवर दिसणार आहेत. या वस्त्रप्रावरणांच्या कलेक्शनच्या माध्यमातून अमृता फडणवीस स्त्री-शिक्षण आणि हातमागाद्वारे तयार करण्यात आलेल्या वस्त्रांचे प्रमोशन करतील.
अमेरिकेच्या मॅनहॅटनमध्ये ८ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी पुण्यातील चासा इन्स्टिट्यूटतर्फे नवोदित फॅशन डिझायनर्सचे कलेक्शन सादर होणार आहे. या वस्त्रप्रावरणांचे सादरीकरण करणाऱ्या मॉडेल्समध्ये अमृता फडणवीस यांचा समावेश आहे. अमृता फडणवीस रॅम्पवर इंडो-वेर्स्टन पद्धतीच्या हातमागाद्वारे तयार करण्यात आलेल्या कपड्यांमध्ये दिसतील. हे कपडे शेतकरी आणि मजूरांच्या मुलांनी तयार केले आहेत. या फॅशन शो विषयी बोलताना अमृता यांनी सांगितले की, मी स्त्री-शिक्षणाचा संदेश देण्यासाठी रॅम्पवर उतरणार आहे. मी रॅम्पवर सादर करणार असलेली वस्त्रप्रावरणे शेतकरी आणि मजूर कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलींच्या कल्पनेतून साकारली आहेत. हा एक आदर्श उपक्रम आहे. तरूण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मी या कार्यक्रमात सहभागी होण्यास तयार झाल्याचे अमृता यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
यापूर्वी अमृता फडणवीस डिझायनर हेमंत त्रिवेदी यांच्या वस्त्रप्रावरणांचे कलेक्शन सादर करण्यासाठी रॅम्पवर उतरल्या होत्या.
दरम्यान, न्यूयॉर्क फॅशन वीकच्या रॅम्पवर उतरताना मला स्वत:ची मूळ ओळख जपण्यास सांगितले आहे. मला इतर मॉडेल्ससारखे बनायचे नाही, असे अमृता यांनी सांगितले. चासा इन्स्टिट्यूट या फॅशन शोमध्ये एकुण १५ डिझाईन्स सादर करणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आम्हाला सदिच्छादूत म्हणून लाभल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया चासा इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी व्यक्त केली.