भेटकार्डे, केक, कल्पक वस्तूंना पसंती

रंग व्हॅलेंटाइनचे : पुणे : व्हॅलेंटाइन डे निमित्त आपल्या प्रियजनांना भेट म्हणून नवनव्या वस्तूंच्या शोधात असलेल्या पुणेकरांसाठी बाजारपेठेबरोबरच घरगुती स्वरूपात हस्तव्यवसाय करणाऱ्या उद्योजकांकडूनही अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केक, भेटकार्डे आणि वैयक्तिक स्वरूपाच्या वस्तूंना यंदा विशेष पसंती असल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत  आहे.

आर्चीज या भेटवस्तूंच्या दुकानात व्हॅलेंटाइन्स डे निमित्त भेटवस्तू आणि भेटकार्डाचे अनेक नवे पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरी स्मार्टफोन वरून शुभेच्छा देणाऱ्या नव्या पिढीला शुभेच्छापत्रांपेक्षा भेटवस्तूंचा पर्याय अधिक हवा असल्याचे दिसते. जुन्या पिढीतील ग्राहक मात्र आवर्जून शुभेच्छापत्रे विकत घेऊन शुभेच्छा देणे पसंत करतात अशी माहिती समीर यांनी दिली. फोटो छापलेले टी-शर्ट, कॉफी मग, उशी हे पर्याय नवे नाहीत, तरी ग्राहक अजून आवडीने त्यांची खरेदी करतात.

केक व्यवसायातील अनुष्का जाजू म्हणाली,की ‘थीम केक’ ही संकल्पना सध्या ग्राहकांच्या आवडीची आहे. व्हॅलेंटाइन डेचे निमित्त असल्याने बदामाच्या आकारातील, लाल रंगातील केकना जास्त मागणी आहे. अनेकदा आपल्या जोडीदाराला काय भेट द्यावी हा प्रश्न पडतो, त्यावर केक हे हमखास उत्तर आहे. केक नको असेल तर डोनट हा पर्यायही निवडला जातो. विशेष म्हणजे, आहार आणि डाएट बाबत सतर्क असलेल्या ग्राहकांसाठी डोनट हा पर्याय उपयुक्त ठरतो.

‘झिया’तर्फे सौंदर्यप्रसाधनांच्या व्यवसायात असलेल्या प्रिया सलवारु म्हणाल्या,की महिलांप्रमाणेच पुरुषदेखील आता त्वचेची काळजी, दिसणे याबाबत जागरुक असतात. त्यांच्यासाठी रसायनविरहित, घरगुती पद्धतीने तयार केलेले साबण, क्रीम, तेलांचे पर्याय आवडीने खरेदी केले जातात. या प्रकारातील काही पर्याय एकत्र करून, त्याचे आकर्षक हँपर्स खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. विविध रंग आणि गंधांचे साबण असलेले हँपर घेण्यास विशेष पसंती मिळत आहे.