कला क्षेत्रातील आठ जणांचा समितीमध्ये समावेश

पुणे : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि पुण्याच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने समिती नियुक्त केली आहे. वीस जणांच्या समितीमध्ये कला क्षेत्रातील आठ तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू असलेल्या जागी बहुमजली सांस्कृतिक केंद्र उभारण्याची संकल्पना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली. मात्र, त्यामध्ये मूळ वास्तू पाडली जाणार का, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. त्यामुळे पुणेकरांच्या अस्मितेचा विषय असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा मुद्दा चर्चेला आला. बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूला धक्का लावता कामा नये या मागणीसाठी अनेक रंगकर्मीनी आंदोलन केले. तर, सर्व प्रयोगकलांसाठी भव्य बहुमजली सांस्कृतिक केंद्र उभे राहणार असेल तर त्याचे स्वागत करण्याची भूमिका काही रंगकर्मीनी घेतली. त्यामुळे रंगमंदिराचा पुनर्विकास करताना कला क्षेत्रातील मान्यवरांच्या सूचनांचा विचार केला जाईल, असे महापौर मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ यांना स्पष्ट करावे लागले.

बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सांगता आणि त्यानंतर पुलंच्या जन्मशताब्दी वर्षांतच रंगमंदिराच्या नूतनीकरणाचा मुद्दा गाजू लागला. यंदाच्या महापालिका अर्थसंकल्पामध्ये बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी तरतूद केली आहे. पुनर्विकासासाठी वीसहून अधिक वास्तुविशारदांनी गेल्या आठवडय़ामध्ये रंगमंदिराचा नियोजित आराखडा महापालिकेकडे सादर केला आहे.

महापालिकेने वीसजणांची समिती नियुक्त करून या प्रक्रियेतील पुढचा टप्पा सुरू केला आहे. या समितीमध्ये उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, माजी स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, भवन विभागाचे अधीक्षक अभियंता आणि वास्तुशिल्पकार यांचा समावेश आहे. तर, प्रसिद्ध वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, श्रीरंग गोडबोले, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि नाटय़ परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांचा आमंत्रित सदस्य म्हणून सहभाग आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे आता मेअखेरीनंतरच समिती कार्यरत होईल अशी शक्यता आहे.