बाह्य़वळण मार्गावर संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू
पार्टी करून मित्र- मैत्रिणी मोटारीतून कात्रज बाह्य़वळण मार्गावरून शनिवारी ( ११ जून) पहाटे लोण्यावळ्याला निघाले.. गंमत म्हणून दोन मोटारींच्या चालकांमध्ये शर्यत लागली.. बघताबघता मोटारीचा वेग ताशी शंभर किलोमीटपर्यंत जाऊन पोहोचला.. परंतु याच वेगाने घात केला आणि मोटार दुभाजकावर आदळून उलटली .. वेगाच्या नशेने मोटारीतील संगणक अभियंता तरुणीचा बळी घेतला..
कात्रज बाह्य़वळण मार्गावर आंबेगाव बुद्रुक परिसरात शनिवारी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात संगणक अभियंता कृतिका प्रकाश नंदलसकर (वय २५, रा. मौर्या कृपा सोसायटी, कर्वेनगर) ही मृत्युमुखी पडली तर सनी अनिल तपासे (वय २८, रा. मल्हार पेठ, सातारा), सुमित मधुकर वंजारी (वय २७, रा. व्यंकटेश क्षितीज सोसायटी, दत्तनगर, आंबेगांव बुद्रुक, कात्रज), आरती सोनवणे (रा. अनुरेखा सोसायटी, कर्वेनगर), सौरभ शिंदे (रा. कर्वेनगर), गणेश गायकवाड (रा. सातारा), तुषार जाधव (रा. सातारा), चैतन्य जोशी (रा. धायरी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
आहेत. मोटारचालक तपासे आणि वंजारी यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी दिली. कृतिका, सनी, सुमित, आरती, गणेश, तुषार, चैतन्य, सौरभ हे मित्र आहेत. कृतिका ही शिवाजीनगर परिसरातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता होती. शनिवारी रात्री सुमित याच्या दत्तनगर येथील घरात पार्टी केली. त्यानंतर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी लोणावळ्याला जाण्याचा बेत आखला. दोन मोटारींतून ते सर्वजण कात्रज बाह्य़वळण मार्गावरून नऱ्हेच्या दिशेने निघाले. त्यावेळी मोटारचालक सनी आणि सुमित यांच्यात वेगाने मोटार नेण्याची शर्यत लागली. बाह्य़वळण मार्गावर असलेल्या हॉटेल गणराजसमोर एकमेकांना मागे टाकण्याच्या नादात दोन मोटारी घासल्या.
मोटारचालक सुमित याचे नियंत्रण सुटले आणि मोटार थेट दुभाजकावर आदळली. मोटार उलटल्याने कृतिकासह आठजण जखमी झाले. गंभीर जखमी झालेली कृतिका ही जागीच मृत्युमुखी पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

वेगाचा काटा शंभरावर अडकला
मोटारचालक सुमित वंजारी आणि सनी तपासे हे ताशी शंभर किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने निघाले होते. सुमित याची मोटार उलटल्यानंतर ती थांबली. पोलिसांनी मोटारीची पाहणी केली. तेव्हा मोटारीचा काटा शंभरावर होता. सुमित आणि सनी हे ताशी शंभर ते एकशेतीस किलोमीटर वेगाने मोटारी चालवित असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.