News Flash

परदेशी पाहुण्यांना ‘परिषदा दर्शन’

वर्षांच्या अखेरीला बहुतेक महाविद्यालयांना निधी संपवण्याची घाई होते

परिषदा ‘आंतरराष्ट्रीय’ असल्याचे भासविण्यासाठी महाविद्यालयांचा आटापिटा

महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणारी चर्चासत्रे आणि परिषदा ‘आंतरराष्ट्रीय’ करण्यासाठी पाहुण्यांना निमंत्रित करायचे आणि सगळ्या महाविद्यालयांमधील परिषदांमध्ये फिरवायचे, असा प्रकार शहरातील महाविद्यालयांमध्ये घडतो आहे. अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झालेलय़ा शोधनिबंधांसाठी अनेक शिक्षक वेतनवाढ, पदोन्नतीच्या लाभांसाठी गुण मिळवत आहेत आणि महाविद्यालयांना खर्चासाठी निधी मिळतो आहे.

वर्षांच्या अखेरीला बहुतेक महाविद्यालयांना निधी संपवण्याची घाई होते. विद्यापीठाची गुणवत्ता सुधार योजना आणि इतर विविध योजनांमधून शैक्षणिक उपक्रमांसाठी महाविद्यालयांना निधी मिळत असतो. त्यातून महाविद्यालये परिषदा, चर्चासत्रे आयोजित करतात. राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरील, आंतरराष्ट्रीय पातळीवरील असा परिषदेचा स्तर कोणता आहे, त्यानुसार संस्थांना निधी मिळतो. त्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय परिषदा घेण्याचे पेव महाविद्यालयांमध्ये फुटले आहे. मात्र प्रामाणिकपणे आयोजित केलेल्या काही अपवादात्मक परिषदा वगळून प्रत्येक महाविद्यालयांत होणाऱ्या या परिषदा खरंच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असतात का याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. परिषदा ‘आंतरराष्ट्रीय’ कशा होतात? आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करायची म्हणजे जगातील विद्यापीठांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणे, विषयानुसार शोधनिबंध मागवणे, नव्या संशोधनांचे सादरीकरण होणे व त्यातून विषयाच्या अनुषंगाने काही निष्कर्ष निघणे ढोबळमानाने अपेक्षित असते. मात्र एवढे सगळे करायचे तर तेवढा खर्च होणार, परदेशी विद्यापीठांकडून संस्थेची माहिती घेतली जाणार, परिषदेच्या विषयाचीही चिकित्सा होणार; या प्रक्रियेला बगल देण्यासाठी महाविद्यालये एकत्र येऊन परदेशातील काही विद्यापीठांमधील पाच शिक्षकांना निमंत्रित करतात. साधारणपणे उद्घाटन वा समारोप समारंभाला या परदेशी पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. त्या पाहुण्यांचा अभ्यासाचा जो विषय असेल, त्याच्याशी थोडाफार संबंध असलेला एखादा विषय परिषदेसाठी निवडला जातो. पाहुण्यांना सगळ्या महाविद्यालयांच्या परिषदांमध्ये एखाद्या भाषणासाठी वा सत्रासाठी फिरवले जाते.

शिक्षकही खूश

महाविद्यालयांमधील परिषदांच्या आयोजनापासून प्रत्येक गोष्टीत राबणारा मुख्य घटक हा त्या महाविद्यालयांतील शिक्षक असतो. या परिषदा शिक्षकांच्याही पथ्यावरच पडत आहेत. पदोन्नती, वेतनवाढ अशा लाभांसाठी शिक्षकांनी कोणत्या चर्चासत्रात सहभाग घेतला, किती शोधनिबंध सादर केले हे पाहिले जाते. या परिषदांमध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र जोडून आपल्या कर्तृत्वाची सांख्यिकी वाढवण्यासाठी शिक्षकांनाही बळ मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 12:56 am

Web Title: conferences appeared foreign guests
Next Stories
1 उमेदवाराची चिल्लर, निवडणूक अधिकाऱ्यांचा ‘गोंधळ’
2 हिंजवडीत तरुणीच्या खुनामुळे कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे – अजित पवार
3 पुण्यात अनर्थ टळला; चांदणी चौकात बसला आग
Just Now!
X