विकासाची अनेक आश्वासने देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी जुमलेबाजी केल्याचा आरोप करत शहर काँग्रेसतर्फे या घोषणाबाजीचा तळजाई टेकडीवर पतंग उडवून निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहन जोशी, वीरेंद्र किराड, मनीष आनंद, विकास लांडगे, अविनाश बागवे, शेखर कपोते आदी या वेळी उपस्थित होते.

सर्वसामान्यांना अच्छे दिन, रोजगार निर्मिती, विदेशातील काळा पैसा देशात आणणे, पारदर्शी कारभार, शेतीमालाला रास्त भाव, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया, परवडणारी घरे, आरोग्य सुविधा, दहशतवादाचा बीमोड अशा अनेक घोषणा देऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला. मात्र या घोषणा म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीने जुमलेबाजी ठरल्यामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे या जुमलेबाजीच्या निषेधार्थ या आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.