जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या काँग्रेसच्या पन्नास कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहून ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्याचे ठरवले आहे. तसेच पुलवामाचा बदला घ्या अशीही मागणी या पत्रांमधून करण्यात आली आहे.

प्रिय मोदीजी ‘मन की बात के बदले खून की बात’ चाहीये, इंडिया डिमांड रिअल सर्जिकल स्ट्राईक, हमे निंदा चाहिये… और एक भी आतंकी जिन्दा नही चाहिए, जगाच्या पाठीवरुन पाकिस्तानचे नाव मिटवा, नोटाबंदी नको तर दहशतवाद बंदी करा असा मजकूर असलेली ही पत्र या 50 जणांनी स्वतः रक्ताने लिहिली आहेत. पुणे शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमित बागुल आणि त्यांच्यासह 49 कार्यकर्त्यांनी ही पत्रे लिहिली असून याबाबत अमित बागुल म्हणाले की, सीमेवर जवान शहीद होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
तर ते पुढे म्हणाले की, आम्ही 50 जणांनी स्वतःच्या रक्ताने हे पत्र लिहिली आहेत. ती ईमेल आणि कुरियर च्या माध्यमातून पंतप्रधाना पाठवण्यात येणार आहेत. या पत्रांची दखल घेऊन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

पाकिस्तानचा झेंडा जाळून ठिकठिकाणी पुण्यात निषेध

जम्मू – काश्मीरच्या पुलवामा जिल्हयात ‘जैश ए मोहम्मद ‘ या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्यात केन्द्रीय राखीव पोलीस दलाचे सीआरपीएफ 40 जवान हुतात्मा झाले आहेत. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहरातील अनेक चौकामध्ये दिवसभरात विविध राजकीय पक्ष, संघटना आणि तरुण वर्ग एकत्रित येत पाकिस्तानच्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर पाकिस्तानचा झेंडा जळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील देण्यात आल्या.