पुणे : शहरासह जिल्ह्यातील वाढत्या करोनाबाधितांची संख्या, खाटांची कमतरता, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि केंद्र सरकारकडून कृत्रिम श्वसन यंत्रणा मिळण्याची प्रतीक्षा या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (१६ एप्रिल) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा होणार आहे. शहरासह जिल्ह्यात प्रामुख्याने रुग्णांवर उपचारांसाठी खाटाच मिळत नसल्याने अतिरिक्त खाटा वाढवण्यावर बैठकीत तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री पवार दर शुक्रवारी करोना सद्य:स्थितीचा आढावा घेत असतात. त्यानुसार विधानभवन येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत शहरासह जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यावर चर्चा के ली जाणार आहे. या बैठकीला शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.

दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शनचे योग्य वितरण होण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील वितरणातील त्रुटी कमी झालेल्या नाहीत. याबाबतही बैठकीत चर्चा के ली जाणार आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यासाठी केंद्र सरकारकडून कृत्रिम श्वसन यंत्रणा देण्यात येणार असल्याचे गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत जाहीर के ले होते. मात्र, अद्याप ही यंत्रणा पुण्यात आलेली नाही. त्यावर मार्ग काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर बैठकीत चर्चा के ली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.