१ कोटी ९० लाख लिटरने खप घटला

पुणे : करोना संसर्गाच्या भीतीने पुणेकरांनी थंड बिअरकडे पाठ फिरवली आहे. गेल्या आर्थिक वर्षात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित  जिल्ह्यात बिअरच्या विक्रीत तब्बल एक कोटी ९० लाख ५८ हजार ७६३ लिटरने घट झाली आहे. करोनामुळे थंड बिअरऐवजी मद्य ग्राहक व्हिस्की, रमकडे वळले असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी बराच कालावधी मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसूल गोळा करण्याचे उद्दिष्टही गाठता आलेले नाही.

गेल्या वर्षी मार्चअखेर टाळेबंदीमुळे मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद करण्यात आली होती. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रतिबंधित क्षेत्रे वगळून मद्यविक्रीची दुकाने खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. पुणे शहर आणि जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने आणि करोनाविषयक नियमांचे उल्लंघन के ल्याप्रकरणी अनेक मद्यविक्री दुकाने, मद्यालयांवर कारवाई करण्यात आली होती. याशिवाय व्यवसायच नसल्याने जागा भाडे, कामगारांचे वेतनासह इतर खर्चांमुळे अनेकांनी हा व्यवसायच बंद के ला आहे. परिणामी गेल्या आर्थिक वर्षात मद्यविक्रीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले, ‘करोनामुळे पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीत मोठी घट झाली आहे. देशी मद्यविक्रीत १६ टक्के , भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यविक्रीत १२ टक्के , तर बिअरच्या विक्रीत ४१ टक्क्यांनी घट झाली आहे. याचा परिणाम महसूलावर देखील झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाला पुणे जिल्ह्यासाठी १९७५ कोटी रूपये महसूल उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा के वळ १६९१ कोटी रूपये महसूल गोळा करण्यात यश मिळाले आहे.’ दरम्यान, करोना संसर्गमुळे पुण्यातील मद्य ग्राहकांनी बिअरकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य विक्रीमध्ये (रम, व्हिस्की) मोठी घट दिसून आलेली नाही. आरोग्य विभागाकडून करोना संसर्ग रोखण्याच्या विविध उपायांमध्ये कोमट पाणी पिण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळेही बिअरच्या विक्रीत घट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही झगडे यांनी सांगितले.