श्वानांच्या तंदुरुस्तीसाठी दैनंदिन सराव मात्र सुरू

पुणे : गंभीर गुन्ह्य़ांची उकल, स्फोटकांचा शोध आणि अमली पदार्थ हुडकून काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पोलीस श्वानांचे प्रशिक्षण करोना विषाणू संकटामुळे थांबले आहे. परंतु श्वानांचे वजन वाढू नये, ते स्थूल होऊ नयेत म्हणून त्यांचा दैनंदिन सराव मात्र सुरू आहे.

पोलीस दलात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांचा माग काढला जात असला, तरी गंभीर गुन्ह्य़ांचा छडा लावण्यात आणि गुन्हेगारांचा माग काढण्यात पोलीस श्वान महत्त्वाची कामगिरी बजावतात. खडतर प्रशिक्षणानंतर श्वान कामगिरीसाठी तयार होतात. परंतु करोनाचा फैलाव वाढल्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर मुख्यालयात असलेल्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) श्वान प्रशिक्षण केंद्रातील कामकाज तूर्तास बंद ठेवले आहे.

करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील श्वान प्रशिक्षण केंद्रातील काम बंद ठेवण्यात आले आहे. तेथे प्रशिक्षणासाठी आलेले श्वान आणि त्यांच्या प्रशिक्षकांना (हँडलर) परत पाठविण्यात आले आहे.

करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर सीआयडीचे शिवाजीनगर मुख्यालयात असलेल्या श्वान प्रशिक्षण केंद्राचे कामकाज तूर्तास बंद ठेवण्यात आले आहे. श्वान केंद्रात  प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणाऱ्या श्वानांना परत पाठविण्यात आले आहे. श्वान जरी परत गेले असले तरी त्यांच्याबरोबर असलेल्या प्रशिक्षकांकडून श्वानांना देण्यात येणारा सराव सुरू असल्याचे ‘सीआयडी’चे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

वापर तीन प्रकारांत..

तपासासाठी वापरण्यात येणाऱ्या श्वानांचा वापर तीन प्रकारांत केला जातो. गुन्ह्य़ांची उकल करणाऱ्या श्वानाला ‘ट्रॅकर’ तसेच स्फोटके हुडकून काढणाऱ्या श्वानाला ‘स्निफर’ असे संबोधिले जाते. अमली पदार्थाच्या कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या श्वानांना ‘नाकरे’ असे म्हटले जाते.

प्रशिक्षण कसे? पोलीस मुख्यालयातील श्वान पथकाकडून श्वानांच्या पिलांची खरेदी केली जाते. पिल्लू सहा महिन्यांचे झाल्यानंतर त्याला प्रशिक्षणासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात पाठविले जाते. श्वानांचा प्रशिक्षण कालावधी सहा ते नऊ महिन्यांचा असतो. प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. खडतर प्रशिक्षण दिल्यानंतर श्वान पोलीस सेवेसाठी सिद्ध होतो.

सराव बंद झाल्यास श्वानांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सरावाअभावी श्वान स्थूल होऊ शकतो. त्यामुळे श्वान प्रशिक्षण केंद्र काही काळासाठी बंद ठेवले असले, तरी श्वानांचा दैनंदिन सराव सुरूच आहे.   

– अतुलचंद्र कुलकर्णी, प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक, सीआयडी

*राज्यातील पोलीस आयुक्तालये, ग्रामीण पोलीस मुख्यालयात ४६ श्वान पथके.

*राज्य पोलीस दलात ५० बॉम्ब शोधक-नाशक पथके आहेत.

*पथकात जर्मन शेफर्ड, लॅब्रोडर, डॉबरमन, बेल्जियम मेलीनाइज जातीचे श्वान.