News Flash

पुणे : अस्थींमुळे करोना होण्याच्या भीतीने नातेवाईक येत नसल्याने पालिका कर्मचारीच करतायत अस्थी विसर्जन

महापालिका कर्मचाऱ्याकडून माणुसकीचे दर्शन

पुण्यामध्ये दिवसोंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. करोनाच्या संसर्गामुळे अनेकांचा मृत्यूही होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. असं असतानाच स्मशानभूमीमध्ये करोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचे नातेवाईक पुन्हा अस्थी घेण्यासाठी येत नसल्याने या अस्थींच्या विसर्जनाचं कामही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावं लागत आहे. कैलास स्मशानभूमीत काम करणारे ललित जाधव यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली आहे.

नक्की वाचा >> पुणे : “मामा, माझ्या आईच्या अस्थी मिळतील ना ओ…”; आठ वर्षाच्या मुलाचा प्रश्न

“आम्ही करोना विषाणूच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सर्व जण काम करीत आहोत. आज सव्वा वर्ष झाले आहे. या दरम्यान आमच्या इथे तीन हजाराहून अधिक करोनाबाधित रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. हा संपूर्ण काळ आणि आताचा काळ देखील आमच्या करिता कठीण आहे. अगदी सुरुवातीला एखादा मृतदेह स्मशानभूमीत रुग्णवाहिकेतून आणल्यावर, त्याच्यासोबत केवळ चालक असायचा. आम्ही येथे पाच जण असायचो, ती व्यक्ती कोण, कुठली आहे. आम्हाला काहीच माहिती नसायचे. रुग्णालयामार्फत आलेला एक कागद त्यावरील नोंद आमच्या डायरीत करून ठेवायचो आणि आज देखील त्याचनुसार काम सुरू आहे,” असं जाधव सांगतात.

“करोना सुरु झाल्यानंतर हळूहळू मृतांची संख्या वाढत गेली. तसा आमच्यावरील ताण देखील वाढत गेला. सुरुवातीला दहा बारा मृतदेह यायचे. आता इथे दररोज साधारण २५ ते ३० मृतदेह येत आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहून मन सुन्न झालं आहे. सुरुवातीला नातेवाईक येत नव्हते. पण आता काही प्रमाणात अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईक येताना दिसत आहे,” असं जाधव सांगतात. नातेवाईक अंत्यसंस्काराला येत असले तरी ते अस्थी घ्यायला येत नाहीत असंही जाधव यांनी म्हटलं आहे. “आता मृतांच्या अस्थी घेण्यास नातेवाईक येत नाही. मी जर अस्थी घेतल्या तर मला देखील हा आजार होईल. या भीतीपोटी नागरिक येत नाही,” असं जाधव म्हणाले.

पुढे बोलताना जाधव यांनी, “माझा अभ्यास एवढा नाही, पण मी जे काही आजवर ऐकले आहे त्यानुसार सांगतो की, एकदा की बॉडी विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले. की सर्व जंतू मारतात. आतामध्ये ७०० अंशांहून अधिक तापमान असते. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये,” असं आवाहन केले आहे. ठआमच्या समोर एक समस्या झाली आहे. इथे दररोज अस्थी गोळा करून आम्ही मातीच्या भांड्यात ठेवतो. पण अनेक नातेवाईक अस्थी घेण्यास येत नाही. आम्ही त्यांची महिनाभर वाट पाहतो आणि मग आम्हीच संगम घाटावर जाऊन पूजा करून अस्थीच विसर्जन करीत आहोत. आजवर ५०० हून अधिक अस्थी विसर्जन आम्ही केलं आहे,” असं जाधव यांनी सांगितलं. या कामामधून महापालिका कर्मचाऱ्याच्या माणुसकीचे दर्शन घडून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 11:05 am

Web Title: coronavirus pune asthi visarjan is done by people working in crematorium svk 88 scsg 91
Next Stories
1 पुणे : “मामा, माझ्या आईच्या अस्थी मिळतील ना ओ…”; आठ वर्षाच्या मुलाचा प्रश्न
2 महिला सुरक्षा, लिंग समानता जागृतीचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश
3 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लस प्रभावी
Just Now!
X