वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेले पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या दोन मुलांनी मंगळवारी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. समीर बाबुराव चांदेरे, किरण बाबुराव चांदेरे अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही चतुश्रुंगी पोलिसांनी अटक केलीये.
अ‍ॅड. आशिष अर्जुन ताम्हाणे (वय २६, रा. शिवसागर हॉटेलमागे, बाणेर) असे या मारहाणीत जखमी झालेल्या वकिलाचे नाव आहे. या प्रकरणी चांदेरे बंधूंसह गणेश इंगवले, मनोज इंगवले व त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताम्हाणे यांनी या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास ताम्हाणे हे मोटारसायकलवरून बाणेर रस्त्याने घरी चालले होते. निळ्या रंगाच्या दुसऱ्या एका मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी माऊली पेट्रोल पंपासमोर ताम्हाणे यांच्या मोटारसायकलला मागच्या बाजूने धडक दिली. त्यामुळे ताम्हाणे हे खाली पडले. त्याचवेळी समीर चांदेरे, किरण चांदेरे, गणेश इंगवले, मनोज इंगवले हे चौघे एका मोटारीतून त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात तलवार, बेसबॉल स्टीक, हॉकी स्टीक होती. आरोपींनी ताम्हाणे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्यावर तलवारीचे वारही करण्यात आले. या घटनेत ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत.