पुणे शहराला टुरिझम सिटी बनवण्यासाठी महापालिका प्रयत्न करेल आणि त्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ उपयुक्त ठरेल, असा विश्वास महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बुधवारी व्यक्त केला. शहरातील ऐतिहासिक स्थळांबरोबरच पुणे दर्शन बसमधून पुण्यातील शैक्षणिक संस्था, विविध उद्योग, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, वारसा वास्तूही दाखवल्या पाहिजेत, अशीही अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.
शहर विकासाचे विविध उपक्रम खासगी कंपन्यांच्या साहाय्याने राबवण्यासाठी पुणे महापालिका, शिक्षण मंडळ आणि श्यामची आई फाउंडेशन यांनी संयुक्तरीत्या सीएसआर संकेतस्थळ तयार केले आहे. त्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. उपमहापौर आबा बागूल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, माजी महापौर चंचला कोद्रे, शिक्षण मंडळाचे सदस्य रवी चौधरी, सहकारनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, शिक्षण मंडळाचे प्रमुख बी. के. दहिफळे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सतीश मगर, फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल बापट यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
पुणे दर्शन बस सेवेच्या माध्यमातून पुण्यातील अनेक चांगल्या संस्था व कंपन्या दाखवता येतील. अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवून पुण्याला टुरिझम सिटी बनवणार असल्याचे महापौरांनी या वेळी बोलताना सांगितले. प्राथमिक शाळांबरोबरच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाही सुरू करण्याची महापालिकेची तयारी आहे, असे उपमहापौर बागूल म्हणाले.
शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. सीएसआरच्या माध्यमातून केवळ सुविधांवर भर न देता एका खासगी कंपनीने एक शाळा दत्तक घ्यावी, अशी सूचना खासदार वंदना चव्हाण यांनी केली. शाळा दत्तक घेतली तर संबंधितांचे शाळेशी व विद्यार्थ्यांशी नाते तयार होईल, असेही त्या म्हणाल्या.
शहरात अनेक खासगी कंपन्या व अनेक उद्योग आहेत. त्यामुळे या उद्योग व कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) म्हणून त्यांची शहर विकासासाठी निधी देण्याची तयारी आहे. त्यासाठी सीएसआर संकेतस्थळाचा उपक्रम उपयुक्त आहे. महापालिकेने कौशल्य विकासाचे उपक्रम राबवावेत, असे मगर यांनी या वेळी सांगितले. महापालिका शाळांमध्ये दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सीएसआरच्या माध्यमातून चांगले उपक्रम राबवता येतील. तसेच शाळांच्या आवश्यकतेनुसार शाळांमध्ये आवश्यक सुविधाही देता येतील, असे आयुक्त कुणाल कुमार म्हणाले.