पुणे : करोना काळात (जानेवारी ते ऑक्टोबर २०२०) जगभरातील वैज्ञानिकांचे, संशोधन संस्थांचे १ हजार ७५४ शोधनिबंध पबमेडमध्ये प्रसिद्ध झाले. त्यापैकी केवळ ८४ शोधनिबंध भारतातील वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे असून केवळ दहा शोधनिबंध हे मूलभूत संशोधन, चिकित्सक अभ्यासाशी संबंधित आहेत. त्यामुळे करोना काळातील संशोधनात देशाचा सहभाग अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष आणि आयुष टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. भूषण पटवर्धन आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील डॉ. सारिका चतुर्वेदी यांनी जर्नल ऑफ आयुर्वेद अँड  इंटेग्रिटिव्ह मेडिसिन या संशोधनपत्रिकेसाठीच्या ‘इंडिया इन कोविड १९ टाइम्स : मॉडर्न अँड वायजर’ या शीर्षकाच्या संपादकीयमध्ये ही आकडेवारी दिली आहे.

आयुष व्यावसायिकांकडे आधुनिक विज्ञान पद्धतींबाबत पुरेसे प्रशिक्षण, निधी, स्रोत आणि पायाभूत सुविधांचा अभाव  आहे. तर दुसरीकडे मुख्य धारेतील भारतीय शास्त्रज्ञ आयुष प्रणालीबाबत संशोधनासाठी उत्सुक नाहीत, अशी स्पष्ट भूमिका यात मांडण्यात आली आहे.

निरीक्षण काय?

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर एव्हिडन्स बेस्ट मेडिसिनने कोविड १९ ट्रॅकर ही प्रणाली विकसित केली आहे. त्यात भारतामध्ये ७११ चाचण्यांची नोंद आहे. तर क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्री ऑफ इंडियातील विदानुसार आयुष अभ्यासामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र करोनाकाळात भारतातील वैज्ञानिक समुदायाने जागतिक संशोधनामध्ये दिलेले योगदान कमी आहे, असे जर्नल ऑफ आयुर्वेद अँड  इंटेग्रिटिव्ह मेडिसिन या संशोधन पत्रिकेसाठीच्या संपादकीयमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

खरेखुरे संशोधनच नाही..  भारतातील वैज्ञानिक, वैद्यकीय समुदाय अंधपणे आपल्याच ज्ञानप्रणालीकडे दुर्लक्ष करून पाश्चिमात्य संकल्पना, पद्धतींबाबत संशोधन करत आहेत. त्यामुळे देशातून खरेखुरे संशोधन होत नसल्याने देश, नागरिकांसाठी उपयुक्त परिणाम साध्य होत नाही. वैद्यकीय-आरोग्य संशोधनात भारतातील संस्थांकडून महत्त्वाचे संशोधन झाल्याचे अपवादानेच दिसून आले आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.