आर्थिक चणचणीतून पुण्यात घडलेला भीषण प्रकार

पुणे : येथील बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीने स्वत:ची तीन वर्षांंची मुलगी आणि सहा वर्षांच्या मुलालाही गळफास दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आर्थिक चणचणीतून दाम्पत्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या दुर्दैवी घटनेत अतुल दत्तात्रय शिंदे (वय ३३), त्यांची पत्नी जया (वय ३२), मुलगा ॠ ग्वेद (वय ६) आणि मुलगी अंतरा (वय ३) मृत्युमुखी पडले आहेत. शिंदे दाम्पत्य राहत असलेल्या सदनिकेतून आवाज येत नव्हता, त्यामुळे शेजारी तसेच घरमालकाला संशय आला. त्यांनी ही माहिती  गुरुवारी रात्री पोलिसांना दिली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तेव्हा अतुल, त्यांची पत्नी जया आणि दोन मुले गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. शिंदे दाम्पत्याने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. त्यांनी स्वत:च्या दोन लहान मुलांनाही गळफास दिला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

शिंदे दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाइड नोट) लिहिलेली नव्हती. त्यांनी सदनिकेतील भिंतीवर खडूने मजकूर लिहिला होता. ‘आम्ही परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत आहोत. कृपया पोलिसांनी या प्रकरणात कोणालाही त्रास देऊ नये’, असा मजकूर भिंतीवर शिंदे दाम्पत्याने लिहून ठेवला होता.

झाले काय?

अतुल शिंदे यांचा छपाईचा व्यवसाय होता. त्यांचा जयाबरोबर प्रेमविवाह झाला होता. सुखसागरनगर भागात ते सदनिका भाडय़ाने घेऊन राहत होते. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी विविध प्रकारची ओळखपत्रे तसेच छोटय़ा जाहिरातींच्या पत्रकांची ते छपाई करत होते. टाळेबंदी लागू झाल्यानतंर शिंदे यांचा व्यवसाय ठप्प होता. शिंदे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.