सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या (स. प. महाविद्यालय) शताब्दी वर्षांची सांगता मंगळवारी होणार असून त्या निमित्ताने शतजन्म शोधताना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.
स. प. महाविद्यालयाची १४ जून १९१६ ला स्थापना झाली. महाविद्यालयाला मंगळवारी (१४ जून) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षांनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर व्याख्यानमाला, चर्चासत्रे असे कार्यक्रम झाले. शताब्दी वर्षांची सांगता पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने मंगळवारी सकाळी ११ वाजता महाविद्यालयात ‘शतजन्म शोधताना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाविद्यालयाच्या स्थापनेत विशेष योगदान असलेल्या पंडित, टिळक आणि पटवर्धन कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या पुढील दहा वर्षांची वाटचाल दर्शवणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता महाविद्यालयाच्या कला मंडळाचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात हे कार्यक्रम होणार असून त्यासाठी शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी दिली.