म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानच्या रस्त्यावर फटाका स्टॉलना परवानगी देताना पक्षनेत्यांनी कारस्थाने केली, असा थेट आरोप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी करण्यात आला. या मुद्यावरून सभेत मोठा गोंधळ झाला. मात्र हा विषय गुंडाळण्यासाठी महापौरांनी सभेचे कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले.
फटाका स्टॉलच्या परवानगीचा विषय सभेत काँग्रेसचे संजय बालगुडे यांनी उपस्थित केला. स्टॉलचे लिलाव सोमवारी होतील अशी जाहिरात देण्यात आली होती. मात्र लिलाव मंगळवारी घेण्यात आले. त्यामुळे लिलाव नियमांना धरून झालेले नाहीत. महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी सोमवारी लिलाव होतील अशी जाहिरात दिली होती, त्यांच्याकडून जाहिरातीचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी बालगुडे यांनी सभेत केली. राष्ट्रवादीचे रवींद्र माळवदकर यांनीही एकूणच फटाका स्टॉलच्या लिलावाबाबत प्रशासनावर टीका केली. या लिलावांमध्येही परस्पर संगनमत करून लिलाव झाले, असा आरोप मनसेचे किशोर शिंदे यांनी केला.
महापालिका प्रशासनाने फटाका स्टॉलसाठी पर्यायी जागा सुचवल्या होत्या. तसेच लिलाव रद्द केलेला नव्हता, तर तो तहकूब केला होता. स्टॉलना नदीपात्रात जागा देण्यासंबंधी आम्ही कार्यवाही करत आहोत. दरवर्षी बावन्न स्टॉलना परवानगी दिली जाते. यंदा ४१ जागांची मागणी करण्यात आली. त्यामुळे पैसे भरून घेण्यात आले, असे निवेदन उपायुक्त सतीश कुलकर्णी यांनी सभेत केले.
महापालिकेत गटनेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत फटाका स्टॉलना परवानगी द्यावी असा कोणताही निर्णय झालेला नव्हता, अशी माहिती यावेळी उपमहापौर आबा बागूल यांनी दिली. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीही बैठकीत निर्णय झालेला नव्हता असे सांगितले.
पक्षनेत्यांनीच फटाका स्टॉलना परवानगी देण्याच्या विषयात कारस्थाने केली असा थेट आरोप संजय बालगुडे यांनी केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे गटनेता गणेश बीडकर यांनी पक्षनेत्यांनी काय कारस्थाने केली, अशी विचारणा करताच सभेत एकच गोंधळ सुरू झाला. या गोंधळातच सभागृहनेता शंकर केमसे यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली. त्याला जोरदार हरकत घेण्यात आली. त्यामुळे त्यांचे शब्द कामकाजातून वगळण्यात आले. हा गोंधळ सुरू असतानाच सभेपुढील विषय सुरू करण्याचा आदेश महापौरांनी दिला.