जेजुरी येथील ऐतिहासिक चिंच बागेमध्ये एक जुने चिंचेचे झाड कोसळून आठ भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समीर सलीम मुजावार (वय ३२), तुषार सुरेश कुदळे (वय २२), हनुमंत जगन्नाथ जगताप (वय ४०) मििलद महेंद्र जगताप (वय २८, सर्व रा.बेलसर, ता.पुरंदर), उत्तम वसंत चव्हाण (वय ४५), योगेश उत्तम चव्हाण (वय १४), सुरज हरिदास कुचेकर (वय १५, सर्व रा. खामगाव, ता. फलटण) आणि बंडू धोंडीबा झगडे (वय ६० रा.जेजुरी) हे भाविक जखमी झाले आहेत.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक विधीसाठी हजारो भाविक चिंचेच्या बागेत उतरले होते. या ठिकाणी झाडांच्या जवळ चुली घालून स्वयंपाक केले जातात. त्यावेळी एक वाळलेले चिंचेचे झाड अचानक उन्मळून पडल्याने मोठा गोंधळ उडाला. झाड कोसळताना आवाज आल्याने अनेकजण सुरक्षित ठिकाणी पळाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या झाडाच्या फांद्या लागल्याने अनेकजण जखमी झाले. त्यातील आठ जणांना गंभीर जखमा झाल्या असून काहींची हाडे मोडली आहेत. झाडाखाली अडकल्याने तीन दुचाकींचे नुकसान झाले. यापूर्वीही चिंचेच्या बागेत झाडे कोसळून भाविक जखमी झाल्याच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. आजची घटना घडल्यामुळे भाविकांच्या सुरक्षेततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. होळकर संस्थानच्या मालकीच्या बहुतेक जागांची विक्री झाल्यामुळे चिंचेची बाग आता शेवटची घटका मोजत आहे.