तलवारीने केक कापणारा गजाआड

पुणे : टाळेबंदी तसेच संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर सराईताने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याची घटना लोणीकाळभोर परिसरात घडली. वाढदिवसाची ध्वनिचित्रफीत पोलिसांच्या हाती लागताच त्याला पकडण्यात आले. तसेच त्याच्याकडून तलवारही जप्त करण्यात आली.

ॠषिकेश सुरेश पवार (वय २१, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पवार सराईत असून तो नेहमी दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्र बाळगतो. कदमवाकवस्तीत एका तरुणाने सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून संचारबंदीत वाढदिवस साजरा केल्याबाबतची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. लोणीकाळभोर परिसरात या ध्वनिचित्रफितीची सध्या चर्चा सुरू होती.

पोलिसांनी ही ध्वनिचित्रफीत पाहिली. संचारबंदीत केक कापणाऱ्याचा शोध सुरू केला. तपासात सराईत गुन्हेगार पवारने संचारबंदीत भररस्त्यात तलवारीने केक   कापून वाढदिवस साजरा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तो लोणीकाळभोर परिसरात फिरत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर क्षीरसागर, काशिनाथ राजापुरे यांनी त्याला सापळा लावून पकडले.