पावसाअभावी राज्य दुष्काळाने होरपळत असताना शहरातील बहुतांश दहीहंडी मंडळांनी त्याकडे कानाडोळा करीत उत्सवाच्या नावाखाली कोटय़वधींचा चुराडा केला. दहीहंडी साजरी करण्याबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांकडेही मंडळांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले. दहीहंडीसाठी अडविलेले रस्ते, त्यामुळे झालेली वाहतुकीची कोंडी, स्पीकरच्या मोठमोठाल्या भिंती, त्यातून निघणारा कर्णकर्कश्य आवाज व कशाचेही भान न ठेवता त्याच्या तालावर नाचणारे कार्यकर्ते.. असेच चित्र शहरात बहुतांश ठिकाणी दिसून आले.
राज्यातील दुष्काळाने सध्या भीषण रूप धारण केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शहरातही पाणी कपातीची वेळ आली आहे. ही परिस्थिती असताना दुसरीकडे पुणे व िपपरी-चिंचवड शहरामध्ये दहीहंडय़ांवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही मंडळांनीच सामाजिक भान ठेवले. मात्र, बहुतांश मंडळांनी दुष्काळाने होरपळणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. प्रतिष्ठित व मोठय़ा समजल्या जाणाऱ्या त्याचप्रमाणे सत्ताधारी भाजप-सेनेच्या काही स्थानिक नेत्यांच्या मंडळांचाही त्यात समावेश होता. वाहतुकीचा रस्ता न अडविण्याबरोबरच हंडीची उंची व स्पीकरच्या आवाजाबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या र्निबधांचेही अनेक मंडळांनी उल्लंघन केले.
दहीहंडीसाठी दुपारपासूनच काही भागामध्ये मंडळांनी रस्ते अडविले होते. त्याबरोबरच स्पीकरच्या भिंती उभारून ढणढणाटही सुरू केला होता. बघ्यांची गर्दी जमविण्यासाठी शहरातील अनेक मंडळांनी यंदाही लाखो रुपये खर्च करून विविध सिनेतारकांना या उत्सवात आणले होते. त्यामुळे या पारंपरिक सणाला ‘ग्लॅमर’ देताना त्याचे स्वरूप बाजारू झाल्याचेही पाहायला मिळाले. संध्याकाळनंतर शहरातील विविध रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले होते, तर काही ठिकाणी बघ्यांच्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला. शहरातील शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वेनगर, सहकारनगरमधील अंतर्गत रस्ते, पर्वती पायथा, कसबा पेठ आदींसह कोथरूड, हडपसर, कात्रज आदी भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.
उद्योगनगरीतही तोच तमाशा
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्येही दहीहंडीच्या नावाखाली कोटय़वधींचा चुराडा झाला. भोसरी, चिंचवड, िपपरी, आकुर्डी, निगडी भागात मोठय़ा दहीहंडय़ा होत्या. लाखो रुपयांची बिदागी घेऊन सिनेतारकांनी हजेरी लावली, त्यांना पाहण्यासाठी गर्दीचा कहर झाला. दहीहंडीसाठी रविवारी दुपारपासूनच वातावरण निर्मिती सुरू होती. त्यासाठी मोठमोठय़ा स्पीकरच्या भिंती लावण्यात आल्या होत्या. प्रमुख चौकांमध्येच दहीहंडी लावण्यात आल्याने नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. या उधळपट्टीत काहींनी सामाजिक भानही ठेवले. वाकड येथील साईराज प्रतिष्ठानने दहीहंडी साजरी न करता मुख्यमंत्री साहायता निधीसाठी एक लाखाचा निधी दिला. याशिवाय, कासारवाडी येथील हिंदूवी मित्र मंडळाने विद्यार्थ्यांना पानिपत, चाणक्य, संस्काराची तसेच थोर पुरुषांची चरित्रे असलेली पुस्तके वाटली.