संगणक क्षेत्रातील पदवी संपादन करून पाच वर्षे खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या अमर शिंदे या तरुणाने आपला भाऊ विशाल वाल्हेकर यांना बरोबर घेत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सजावट, ध्वनी व संगीत या क्षेत्रात आवड असल्याने अमर साउंड सव्‍‌र्हिस नावाने स्वत:ची कंपनी स्थापन केली. व्यावसायिक संगीत व ध्वनी व्यवस्था, मोठमोठय़ा कार्यक्रमांना लागणारी प्रकाश व्यवस्था, लग्न समारंभात उभे करण्याचे सेट्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, लाइव्ह कॉन्फरन्स, कार्यक्रमांसाठी लागणारे व्यासपीठ, संगीत संध्या कार्यक्रमांचे आयोजन अशा विविध सेवा कंपनीकडून पुरवल्या जातात. पुण्याबरोबरच सोलापूर, महाबळेश्वर आणि कर्नाटक राज्यातही कंपनीने आपली सेवा दिली आहे. अन्यत्र मागणी आल्यासही सेवा देण्याची कंपनीची तयारी असून त्या दृष्टीने कंपनीची वाटचाल सुरू आहे.

अमर शिंदे आणि विशाल वाल्हेकर यांनी १९९८ मध्ये अमर साउंड सव्‍‌र्हिस आणि ए. एस. इव्हेंट्स कंपनीची स्थापना केली. परंतु, २०१६ पासून अमर आणि विशाल यांनी पूर्ण वेळ व्यवसाय करण्याचे ठरवले. कंपनीची नोंदणी अमर साउंड सव्‍‌र्हिस या नावाने प्रोप्रायटरशिप फर्म म्हणून आहे. तर, ए. एस. इव्हेंट्स हा कंपनीचाच एक विभाग आहे. विशाल यांनी २०१२ मध्ये बीसीएची (बॅचलर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन) पदवी घेतली. त्यानंतर पाच वर्षे एका खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. मात्र, नोकरीमध्ये रस नसल्याने आणि आधीपासूनच व्यवसाय करण्याची इच्छा असल्याने त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. संगीत, प्रकाश योजनेची व्यवस्था यांमध्ये विशाल यांना विशेष आवड आहे. तसेच त्यांचे मित्रही याच व्यवसायात आहेत. मित्रांना हा व्यवसाय करताना त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे या व्यवसायात प्रचंड संधी असल्याने २०१६ मध्ये नोकरी सोडून पूर्णपणे हाच व्यवसाय करण्याचा निर्णय विशाल यांनी घेतला आणि कंपनीच्या कामकाजात सहभागी झाले. व्यावसायिक संगीत व ध्वनी व्यवस्था, मोठमोठय़ा कार्यक्रमांना लागणारी प्रकाश व्यवस्था, लग्न समारंभात उभे करण्याचे सेट्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, लाइव्ह कॉन्फरन्स, कार्यक्रमांसाठी लागणारे व्यासपीठ, संगीत संध्या कार्यक्रमांचे आयोजन अशा विविध सेवा कंपनीकडून पुरवल्या जातात.

कंपनी सुरू केल्यानंतर व्यवसायाचा अनुभव नसल्याने अमर आणि विशाल यांना सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या. भांडवल उभे करण्यासाठी पैशांची गरज होती. आई-वडिलांकडून पैसे घ्यायचे नाहीत, असे आधीच ठरवले होते. त्यामुळे स्वत: साठवलेले काही पैसे, काही मित्रांकडून घेतले, वेळप्रसंगी कर्जही काढले. तसेच सुरुवातीला कामे आल्यानंतर आवश्यक साहित्य भाडय़ाने घेताना संबंधित विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने पैसे देण्याची विनंती केली. अशा विविध अडचणींतून जावे लागले. कंपनीची जाहिरात फेसबुक, वॉट्स अ‍ॅप अशा समाजमाध्यमातून केली. सुरुवातीचा खडतर काळ गेल्यानंतर गणेशोत्सवात मिरवणुकीकरिता पहिल्यांदा बोलावणे आले. पुण्यातील गणेशोत्सवाबरोबरच विविध सण, उत्सवांमध्ये कंपनीला बोलावणे येते. पुण्यातील भोसरी, भोरबरोबरच सोलापूर, महाबळेश्वर, कर्नाटक राज्यातही कंपनीने सेवा दिली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमधील भोसरी भागात विशाल यांच्या मित्राचे लॉन्स आहे. तेथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी कंपनीकडूनच सेवा दिली जाते.

‘स्वत:चा व्यवसाय करण्याची आधीपासूनच आवड होती. हा व्यवसाय मी आणि माझी टीम काम म्हणून करत नाही. काम करायचे म्हटले, की कंटाळा येतो, एका ठरावीक कालावधीनंतर तेच ते काम वेळी काम नकोसे होते. आवड म्हणून केलेल्या कामाचा कधीच कंटाळा येत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे पूर्ण वेळ व्यवसाय करायचे ठरवले आणि व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला प्रचंड अडचणी, अनेक समस्या आल्या. परंतु, कामे करत गेलो. नोकरी सोडून उगाच व्यवसाय करायचे ठरवले, असे आतापर्यंत कधीच वाटले नाही. इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे दर्जेदार सेवा देऊन ग्राहकाचा विश्वास संपादन करण्याचे काम सर्वप्रथम केले,’ असे विशाल सांगतात.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात ताडीवाला रस्त्यावर शॉप क्रमांक सहा, इंद्रप्रस्थ अपार्टमेंट येथे कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीकडून आतापर्यंत अनेक लग्न समारंभात राजवाडा, तिरुपती मंदिर, बाहुबली चित्रपटातील एखाद्या प्रसंगाचा सेट उभा केला आहे. ग्राहकांकडून मागणी येईल, त्यानुसार सेट उभा करून दिला जातो. याबरोबरच राजकीय कार्यक्रमांसाठी भव्य व्यासपीठ तयार करणे, लग्न समारंभात चारचाकी सजावट, कॉर्पोरेट इव्हेंट्स, सेलिब्रिटींचे कार्यक्रम, लाइव्ह कॉन्फरन्स, कंपनीच्या पार्टी, सेलिब्रिटी इव्हेंट्स, संगीत संध्या अशा विविध कार्यक्रमांत कंपनीची सेवा दिली जाते. या सर्व सेवा एकत्रित द्यायच्या झाल्यास साधारणपणे पंचवीस लाख रुपयांपर्यंत शुल्क कंपनीकडून घेतले जाते. तर, केवळ ध्वनी, प्रकाश योजना अशी एकच सेवा घेतल्यास त्याचे वेगवेगळे शुल्क आहे. विशाल यांच्याबरोबर त्यांचा मावस भाऊ अमर शिंदे हे देखील कंपनीचे कामकाज पाहतात. तर, शाहरूख शेख, मयूर कांबळे, राहुल ठाकुर, शक्ती धेंडे, विनोद कट्टीमनी, नागराज विटेकर, अंकीत भोसले, गणेश कुडनूर, सुमेध शिंदे हे मित्र कंपनीत काम करतात. शाहरूख आणि मयूर डीजे म्हणून काम पाहतात. राहुल कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचे संचालन करतात आणि उर्वरित सदस्यांना आलेल्या मागणीनुसार कामांची वाटणी करून दिली जाते.

‘सद्यपरिस्थितीत कंपनीला एवढी मागणी आहे, की स्वत:चे साहित्य कमी पडत आहे. आधुनिक साहित्य खरेदी करण्याचा विचार आहे. देशभरातून कुठूनही मागणी आल्यास सेवा देण्याची कंपनीची तयारी आहे. त्या दृष्टीने मागणी कशी येईल, याबाबत प्रयत्न करणार आहोत. त्याकरिता कंपनीचे स्वत:चे संकेतस्थळ तयार करण्याचा मानस आहे. तसेच बाजारात दररोज नवनवीन ट्रेंड येत असल्याने त्यानुसार कामात, सेवेत बदल करावे लागतात. त्यामुळे या नव्या बदलांनुसार अद्ययावत राहण्याचे आव्हान कंपनीसमोर आहे. परंतु, मी आणि माझी टीम हे आव्हान नक्की पेलू शकेल,’ असा विश्वासही अमर व्यक्त करतात.

prathamesh.godbole@expressindia.com