पंतप्रधानांबद्दल शेरेबाजी करून वाद ओढवून घेतलेल्या नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी माफी मागावी, अशी सर्वत्र जोरदार मागणी होत असतानाच संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सबनीस यांनीही हा वाद मिटवावा, असे जाहीर आवाहन सोमवारी सबनीस यांना केले. साहित्यसंमेलन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना दस्तुरखुद्द पाटील यांनी केलेल्या आवाहनाला संमेलनाध्यक्ष प्रतिसाद देणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पंतप्रधान ही आदरणीय व्यक्ती असून त्यांना मान हा दिलाच पाहिजे. या गोष्टी समजून घेत नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनीच पुढाकार घेऊन वाद मिटवावा, अशी भूमिका िपपरी-चिंचवड येथे होणाऱ्या साहित्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी सोमवारी मांडली. साहित्यसंमेलन हा मराठीचा उत्सव आहे. तो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे यासाठी आपण सारेच जण धडपडत आहोत. असे असताना वादविवाद करून आपण उद्या नव्या पिढीला काय संचित देणार आहोत, असा सवालही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांविषयी अनुदार उद्गार काढले होते. सबनीस यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केली होती. मात्र, आपल्या मताशी ठाम असल्याचे सांगत सबनीस यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर सबनीस यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढत साबळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीमध्ये आंदोलनही करण्यात आले. मात्र, हा वाद सुरू झाल्यानंतर आपले सबनीस यांच्याशी एकदाही बोलणे झालेले नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधानांचा मान हा राखलाच पाहिजे. या गोष्टी समजून घ्याव्यात आणि त्यानुसार कार्य करावे, अशी विनंती श्रीपाल सबनीस यांना प्रत्यक्ष भेटून करणार असल्याचे डॉ. पी. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लेखक म्हणून त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्याविषयी आम्हाला काहीही म्हणायचे नाही, पण पंतप्रधानांवर त्यांनी केलेल्या टीकेशी आम्ही सहमत नाही. अनेकांना हे रुचलेले नाही. त्यामुळे सबनीस यांनीच पुढाकार घेऊन हा वाद मिटवावा, अशी विनंती आपण करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. हे वातावरण ध्यानात घेऊन ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्यासह काही लेखकांनी आम्ही संमेलनाला येऊ इच्छित नाही, असे सांगितले. लेखक आयुष्यात एकदाच अध्यक्ष होत असतो. हे अध्यक्षपद निर्विघ्नपणे पार पडावे, असे आम्हाला वाटते, अशी पुस्तीही पाटील यांनी जोडली.
 साबळे भूमिकेवर ठाम
खासदार अमर साबळे यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. संमेलनाच्या मंडपामध्ये कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन करून मराठीच्या या उत्सवाला गालबोट लावणार नसल्याचे त्यांनी आपल्याला सांगितले. मात्र, पंतप्रधानांविषयी काढलेल्या उद्गाराबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत सबनीस यांना संमेलनात पाऊल ठेवू दिले जाणार नाही, ही भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.