‘देशात ३२ ते ३५ टक्के  व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. प्रत्येक तीन व्यक्तींमधील एक व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त असून जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास त्रास टाळता येऊ शकेल,’ असे मत प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केले.
द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी ‘रक्तदाबाविषयी सर्वकाही’ या विषयावर डॉ. हिरेमठ यांचे व्याख्यान झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ‘शतायुषी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे प्रमुख डॉ. अरविंद संगमनेरकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. हिरेमठ म्हणाले,‘वजन कमी करणे, तणावरहित जगणे, प्रामुख्याने शाकाहारी व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असलेले अन्न सेवन करणे, कच्च्या अन्नपदार्थाचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे. आपण रोजच्या जेवणात लोणची, चटण्या, पापड अशा विविध रुपात प्रचंड मीठ खातो. हे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. दारु आणि सिगारेट ही व्यसने उच्च रक्तदाबाच्या दृष्टीने त्रासदायक आहेत.’
वाघोली येथील डॉ. सदानंद सरदेशमुख यांना या वेळी ‘शतायुषी आरोग्य सेवा पुरस्कार’, अंबरनाथ येथील डॉ. चिंतामण म्हात्रे यांना ‘शतायुषी सामाजिक आरोग्य व आरोग्य शिक्षण पुरस्कार’ आणि डॉ. अनिश ढोरे-पाटील यांना ‘शतायुषी सवरेत्कृष्ट वैद्यकीय विद्यार्थी पुरस्कार’ प्रदान करुन गौरवण्यात आले. अंकातर्फे घेण्यात आलेल्या लेखन स्पर्धेत भारती सावंत, डॉ. मनीषा भोजकर यांनी प्रथम क्रमांकाचे, तर मीनल श्रीखंडे, भा. ल. महाबळ यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.