अपघात टाळण्यासाठी उपाययोजना; सातारा रस्त्याच्या कामाबाबतही सूचना

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातून जाणारे महामार्ग आणि इतर रस्त्यांवर ५१ अपघातप्रवण क्षेत्रे ठरविण्यात आली असून, या सर्व क्षेत्रांच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने रस्त्यांवरील या क्षेत्रांची दुरुस्ती मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली असून, सातारा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबतही बैठकीत सूचना करण्यात आल्या.

रस्ते अपघातांची कारणे, उपाययोजना आणि वाहतुकीच्या दृष्टीने सर्वंकष अभ्यास करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा सुरक्षा समितीची स्थापना झाली असून, पुणे जिल्ह्याच्या समितीची बैठक शुक्रवारी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात शहर आणि जिल्ह्यातील वाहतुकीचा आढावा घेऊन उपाययोजना सुचविण्यात आल्या. खासदार अनिल शिरोळे, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, नम्रता पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे यांच्यासह इतर शासकीय विभागांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.

समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षी शहर आणि जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. रस्त्यांवर जिल्ह्यामध्ये ५१ अपघातप्रवण क्षेत्रे ठरविण्यात आली आहेत. त्यातील २५ क्षेत्रांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. इतर २५ क्षेत्रांच्या दुरुस्तीसाठी याच आठवडय़ात प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे बांधकाम विभागाकडून बैठकीत सांगण्यात आले. अध्यक्षांनी  त्यात पुणे- सातारा, पुणे- नगर, पुणे- नाशिक, त्याचप्रमाणे पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्याबरोबरच अपघातप्रवण क्षेत्रांच्या कामाचा आढावा घेतला.

पुणे- सातारा रस्त्यावरील रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. या रस्त्याच्या कामाबाबतही बैठकीत सूचना करण्यात आल्या. पुणे- सातारा रस्त्यावर पुलांची कामे सुरू असलेल्या भागामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी सेवा रस्त्यांची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना अध्यक्षांकडून देण्यात आल्या. मांढरदेव यात्रा लवकरच सुरू होणार असल्याने सातारा रस्त्यावरील वाहतूक वाढणार आहे. त्यातून कोंडीही वाढण्याची शक्यता असल्याने योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल आवश्यक

खासदार अनिल शिरोळे यांनीही बैठकीमध्ये शहर आणि जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. पादचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी पदपथ अरुंद झाले आहेत. त्याचप्रमाणे रस्ता ओलांडणाऱ्या सिग्नल यंत्रणा आवश्यक असून, ती कार्यान्वित करण्यात यावी, अशी प्रमुख सूचना त्यांनी मांडली. दिवे घाट ते जेजुरी या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असून, या रस्त्यावर दुभाजक नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचा प्रस्ताव तयार करून तातडीने निधी उपलब्ध करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.