सुगंधी तेल आणि सुवासिक उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान.. नवे कपडे.. कुटुंबीयांसमवेत फराळाचा आस्वाद.. मुलांसमवेत उडविलेले फटाके.. दिवाळी म्हटली की हे चित्र डोळ्यासमोर येते; पण दररोज भल्या पहाटे आपल्या घरी वृत्तपत्र पोहोचविण्याची सेवा देणाऱ्या वृत्तपत्र व्यावसायिकांना दिवाळी साजरी करण्याचा आनंद एकच दिवस मिळतो. वृत्तपत्राला पाडव्याला सुट्टी असल्याने ही सेवा देणाऱ्या व्यावसायिकांची दिवाळी केवळ भाऊबीजेलाच साजरी होते आणि इतर दिवशी काम संपवून घरी आलो की दिवाळी, अशी या मंडळींची दिवाळी असते.
ऐन दिवाळीतही भल्या पहाटे उठून वृत्तपत्र वाटपाचे काम गेली अनेक वर्षे करत असलेल्या विजय पारगे, दत्ता पिसे, एस. बी. मारवाडी, संजय वडके, विजय भूमकर, राम दहाड, अनंत भिकुले आणि संतोष ढाके या व्यावसायिकांनी त्यांचे दिवाळीतील अनुभव शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. दिवाळी असली तरी भल्या पहाटे उठून कामाला सुरुवात करणे हीच आमची दिनचर्या. वृत्तपत्र वाटपाचे काम आटोपून घरी परतल्यानंतरच माझे अभ्यंगस्नान होते. या व्यवसायामध्ये शंभर वर्षे पार केलेल्या मारवाडी घराण्याच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी एस. बी. मारवाडी सांगत होते.. काम संपवून घरी जातो तेव्हा मुलांचे अभ्यंगस्नान झालेले असते. लहानपणापासूनच हे काम करीत असल्याने माझ्या शालेय जीवनामध्येही मला फटाके उडवता आलेच नाहीत. मुलांसमवेतही हा आनंद केवळ संध्याकाळीच घेता येतो. एकच दिवस सुट्टी असल्याने दिवाळीला परगावी जाता येत नाही, असेही मारवाडी म्हणाले.
‘सदैव सेवेस सज्ज’ हे आमचे ब्रीद असल्यामुळे ऐन दिवाळीतही पहाटे तीन वाजल्यापासूनच दिवस सुरू होतो. दिवाळी असल्याने वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या पुरवण्या भरण्यापासून ते वृत्तपत्रांचे वितरण करून घरी परतेपर्यंत उशीर होतो. दिवाळीच्या अभ्यंगस्नानापासून ते फटाके उडविण्यार्पयचा हा आनंद फक्त भाऊबीजेला मिळतो, असे गेली पंचवीस वर्षे या व्यवसायामध्ये असलेल्या संजय वडके म्हणाले.
विजय भूमकर गेली पस्तीस वर्षे या व्यवसायात आहेत. हा माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहे. त्यामुळे काम तर करावेच लागते; पण सर्व जण सुटीचा आनंद घेत असताना आपण सुटी न घेताही काम करतो, करू शकतो, याचा अभिमानही वाटतो. पूर्वी मुंबईहून पुण्यात अंक यायचे. ते वाटायला दुपार व्हायची. मात्र आता त्या तुलनेने काम लवकर उरकते. ते संपवून घरी गेलो की आमची दिवाळी.. भूमकर सांगत होते.
वृत्तपत्र वाटप आणि वृत्तपत्रांचा स्टॉल अशा दोन्ही व्यवसायात गेली सव्वीस वर्षे असलेले राम दहाड म्हणाले, की ही ग्राहकांची सेवा आहे. त्यामुळे हे काम केल्याचा आणि तेही ऐन दिवाळीतही काम केल्याचा आनंदच वाटतो. घरच्या मंडळींना वाटतेच की आम्ही दिवाळीत तरी घरी असावे. आम्हालाही आनंद घ्यावासा वाटतो; पण शेवटी काम महत्त्वाचे आहे हे मानावेच लागते.
अनंत भिकुले गेली सव्वीस वर्षे हा व्यवसाय करत आहेत. ते म्हणाले, की सर्व कुटुंब दिवाळी साजरी करत असताना आम्ही कामावर असतो; पण तेवढे काम संपले की म्हणजे दोनतीन तास उशिराने आम्हीही दिवाळी साजरी करतोच. ‘प्रत्येक जण घरात दिवाळी साजरी करताना आपण वृत्तपत्र वाटत फिरतोय असा नकारात्मक भाव होता; पण आता जेव्हा मी घरोघरी जातो तेव्हा सगळ्याच घरी दिवाळी साजरी होत असते. त्यामुळे मी शंभर ठिकाणी दिवाळी साजरी करतो अशी माझी भावना होते,’ असा अनुभव संतोष ढाके सांगतात. गेली पंचवीस वर्षे ते या व्यवसायात आहेत.

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या विविध विभागांतर्फेदिवाळीच्या निमित्ताने विक्रेत्यांसाठी अनेक उपक्रम केले जातात. विशेषत: दिवाळीपूर्वी तेल, साखर, डाळी, गहू, रवा, मैदा आदी फराळासाठी लागणारे साहित्य, तसेच सुगंधी साबण आणि इतरही वस्तूंची भेट विक्रेत्यांना देण्याचा उपक्रम आवर्जून आयोजित केला जातो.
विजय पारगे, अध्यक्ष, दत्तात्रय पिसे, वरिष्ठ उपाध्यक्ष
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ

आमची दिवाळी पोलिस ठाण्यात!
प्रतिनिधी, पुणे<br />घरातले लक्ष्मीपूजन उरकून त्याच वेशात गाठलेली पोलिस चौकी.. दिवसाची डय़ूटी करावी लागते त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत जागून हौसेने केलेला फराळ.. आणि सहकाऱ्यांच्या पहिल्या दिवाळसणाचे कौतुक जपत परस्परात सुट्टय़ांचे केलेले नियोजन.. अशी असते महिला पोलिस अधिकाऱ्यांची दिवाळी..!
लक्ष्मीपूजनाच्या वेळी दागिने आणि सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढते. त्या दिवशी पोलिसांकडून मुद्दाम सापळा रचून साखळी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कामाचा अनुभव वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुजा देशमाने यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, ‘मी सहकारनगरला पोलिस अधिकारी असताना घरातले लक्ष्मीपूजन आटोपून लगेच डय़ूटीवर जाणार होते. पूजेच्या निमित्ताने मी साडी नेसून दागिने घातलेले होते, त्यामुळे मी तशीच चौकीवर गेले आणि चोरांसाठी रचलेल्या सापळ्याचा मीच एक भाग झाले. ती आठवण कायम लक्षात राहिली. असे प्रसंग पूर्वी चित्रपटांत पाहिले होते; पण दिवाळीत ते स्वत: अनुभवले.’
सुट्टय़ांच्या नियोजनाबद्दल त्या म्हणाल्या, ‘ज्याला पाडवा साजरा करायचा आहे त्याला पाडव्याला, ज्याला भाऊबीजेला सुट्टी घेणे गरजेचेच आहे त्याला भाऊबीजेला, अशी विभागणी आम्ही करतो. जे कर्मचारी वा अधिकारी बाहेरगावचे आहेत त्यांच्या सुट्टीला प्राधान्य देतो. माझ्या पोलिस ठाण्यात दोन महिला पोलिसांचा पहिला दिवाळसण आहे. अशा भावना जपणेही गरजेचे असते.’ विकतचा फराळ फारसा आवडत नसल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत जागून फराळ बनवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे शाखा) स्मिता जाधव या देखील हौसेने फराळ घरीच बनवतात. त्या म्हणाल्या, ‘दिवाळीचे चार दिवस घरी थांबावे असे सर्वानाच वाटते, पण जी सुट्टी मिळेल ती आमची असते. गेल्या वर्षी एका ठिकाणी ऐन दिवाळीत दंग्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि आम्हा सगळ्यांना सर्व कामे सोडून यावे लागले होते. अशा वेळी खूप चिडचिड होते. पण दिवाळीत आम्ही पोलिस ठाण्यातही आकाशकंदील लावतो, रांगोळी काढली जाते, एकमेकांत मिठाई वाटून दिवाळीचा ‘फील’ आणण्याचा प्रयत्न होतो.’

‘गॅस’साठी सुटीची अदलाबदल
गॅस सिलिंडर ही घरोघरीची अत्यंत आवश्यक गोष्ट. त्यातही सणासुदीला गॅस गेला किंवा नोंदवलेला गॅस आला नाही, तर गृहिणी अस्वस्थ होतात; पण घरोघरची गॅसची गरज भागवण्यासाठी सिलिंडर पोहोचवणाऱ्यांना ऐन दिवाळीत सुटी न घेताच काम करावे लागते. त्यासाठी हे सर्व जण सुटय़ांची आदलाबदल करून एकमेकांच्या सोईने कामावर आलेले असतात आणि त्यामुळेच ऐन दिवाळीतही गॅस ग्राहकांची गैरसोय टाळणे वितरकांना शक्य होते.
दिवाळीतले चारही दिवस ग्राहकांना गॅस पुरवण्यासाठी बहुतेक सर्व गॅस वितरक नियोजन करत असतात. त्यामुळे एखादाच दिवस पूर्ण सुटी घेणे किंवा लक्ष्मीपूजनानंतर अर्धा दिवस सुटी घेणे असा मार्ग काढला जातो. दिवाळीच्या आधी दहा-बारा दिवसांपासूनच गॅसची मागणी खूप वाढलेली असते. त्यामुळे या काळातही अधिकाधिक ग्राहकांना गॅस पुरवण्याचे काम करावे लागते. तसेच ऐन दिवाळीतही ग्राहकांना गॅस मिळावा असाही प्रयत्न वितरकांकडून आवर्जून केला जातो. अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या, वाहतूकदारांच्या व प्रत्यक्ष गॅस पोहोचवणाऱ्यांच्या सुटय़ांचेही नियोजन करावे लागते. मात्र दिवाळीत हे सर्व जण कामालाच प्राधान्य देतात आणि काम बंद राहणार नाही, ते अगदी नेहमी प्रमाणेच सुरू राहील असे नियोजन करून आलटून पालटून सुटय़ा घेतात, अशी माहिती कॅम्प, पूलगेट येथील अरिहंत गॅस एजन्सीचे भरत जैन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
या काळातही गॅसगळती संबंधीच्या तक्रारी चोवीस तास स्वीकारल्या जातात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी देखील चोवीस तासांची यंत्रणा वितरकांना तयार ठेवावी लागते. त्याचेही नियोजन करावे लागते. मात्र या काळात या तक्रारींचे निराकरण करणारे जे कुशल तंत्रज्ञ असतात, ते केवळ मोबाइलवरून माहिती देताच तत्काळ अशा तक्रारींचे निराकरण करतात, असेही जैन यांनी सांगितले.