संचारबंदीत ओळखपत्र पाहून सोडण्याचे आदेश

पुणे : शहरातील खासगी रुग्णालये तसेच छोटे दवाखाने टाळेबंदीत खुले करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आल्यानंतर कामावर जाणाऱ्या डॉक्टरांना तसेच कर्मचाऱ्यांना अडवण्याचे प्रकार घडले. या पार्श्वभूमीवर डॉक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना नाकाबंदीवरील कर्मचाऱ्यांनी अडवू नये, असे आदेश वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिले.

टाळेबंदीच्या काळात शहरातील खासगी रुग्णालये आणि छोटे दवाखाने बंद आहेत. शासनाकडून खासगी रुग्णालये तसेच छोटय़ा दवाखान्यांचे कामकाज नियमित सुरू करण्याचे आवाहन केल्यानंतर पुन्हा रुग्णालये, दवाखाने सुरू झाले. टाळेबंदीच्या काळात शहरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. नाकाबंदीवरील कर्मचाऱ्यांनी डॉॅक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अडवू नये, असे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिले. डॉक्टरांकडील ओळखपत्र तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी दिलेले पत्र पाहून नाकाबंदीवरील कर्मचाऱ्यांनी त्यांना सोडावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी शहरातील एका खासगी रुग्णालयात जात असलेल्या कर्मचाऱ्याने डॉक्टरांचे ओळखपत्र तसेच त्यांनी दिलेले पत्र दाखविले होते. नाकाबंदीवरील पोलीस कर्मचाऱ्याने हे पत्र ग्राह्य़ धरले नव्हते. त्यामुळे या घटनेची दखल घेऊन डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना अडवू नये, असे आदेश दिले आहेत.