पिंपरी : पिंपरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएमएच) डॉक्टरांचे खासगी रुग्णालयांशी असलेले संबंध आणि त्यातील आर्थिक लागेबांधे हा विषय सर्वश्रुत आहे. याच कमिशनच्या वादातून मध्यरात्रीच्या सुमारास दोन डॉक्टरांमध्ये हाणामारी झाल्याची घटना चव्हाण रुग्णालयात घडली.

बुधवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजता झालेल्या या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी कामावर असलेला मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये हा वाद झाला. तू माझ्या रुग्णालयात रुग्णांची शिफारस का करत नाहीस, दुसऱ्या रुग्णालयांमध्येच रुग्ण का पाठवतोस, असा मुद्दा खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरने केला. तेव्हा तू मला कोण विचारणार, असे प्रत्युत्तर पालिकेच्या डॉक्टरने दिले. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्याचे पर्यावसन दोघांच्या हाणामारीत झाले. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेले असून उशिरापर्यंत पोलीस चौकीत तक्रार दाखल झाली नव्हती. पोलिसांकडे विचारणा केली असता, आमच्यापर्यंत हे प्रकरण आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती मागवून घेतली असल्याचे सांगण्यात आले.

चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवण्याचे काम येथील वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांकडून केले जाते. त्या मोबदल्यात त्यांना खासगी रुग्णालयांकडून कमिशन दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे हा प्रकार सुरू आहे. कमिशनवरून डॉक्टरांमध्ये अनेकदा खटके उडाल्याची उदाहरणे आहेत. आता थेट हाणामारीचा प्रकार घडल्याने कमिशनचा व्यवहार चव्हाटय़ावर आला आहे.