शहरात सध्या थंडीचा चांगलाच कडाका जाणवत असला, तरी खासगी प्रवासी बसने हिवाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मात्र चांगलाच घाम फुटला आहे. प्रवाशांची हिवाळी लूटमार करण्यासाठी महिन्यापासून बंद करण्यात आलेले खासगी बसचे बुकिंग नुकतेच सुरू करण्यात आले असून, बहुतांश मार्गावरील भाडे दुप्पट करण्यात आले आहे. या हिवाळी लुटीमुळे प्रवासी चांगलाच हैराण झाला आहे.
उन्हाळी व दिवाळीच्या सुटय़ांबरोबरच डिसेंबर महिन्यामध्येही अनेकांकडून विविध ठिकाणी पर्यटनाच्या योजना दरवर्षी करण्यात येतात. साधारणत: २० डिसेंबर ते नव्या वर्षांपर्यंत पर्यटनाचा हा हंगाम सुरू असतो. हा कालावधी खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून ‘कमाईचे दिवस’ म्हणून ओळखला जातो. अडलेल्या किंवा गरज असलेल्या प्रवाशांकडून हव्या त्या प्रमाणात भाडेअकारणी या काळातही केली जाते. प्रवाशांची ही लूटमार सध्याही सुरू झाली आहे.
अनेकांकडून सुमारे एक ते दीड महिना आधी प्रवासाची योजना केली जाते. त्यानुसार त्याचवेळी बसचे बुकिंग मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, मागणी असलेल्या मार्गावरील बुकिंग महिन्यापूर्वीच बंद केले जात असल्याचा अनुभव आहे. यंदाच्या वर्षीही सुमारे महिन्यापूर्वी मागणी असणाऱ्या गोवा, हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद आदींसह काही मार्गावरील बुकिंग बंद करण्यात आले होते. मागणीच्या काळात एकदम मोठय़ा प्रमाणावर प्रवासी आल्यानंतर मनमानी पद्धतीने भाडेवसुली करण्यासाठीच हे बुकिंग आधी दिले जात नसल्याचे अनेकदा स्पष्टही झाले आहे. त्यानुसार खासगी गाडय़ांचे बंद करण्यात आलेले बुकिंग नुकतेच सुरू करण्यात आले असून, विविध खासगी प्रवासी कंपन्यांकडून मागणी करण्यात येणारे बसभाडे ऐकून प्रवाशांना ऐन थंडीच्या काळातही घाम फुटतो आहे.
पुणे-गोवा या मार्गावर इतर वेळेला दीड हजारांपर्यंत भाडे आकारले जाते. मात्र, या मार्गावर सध्या तीन हजारांपर्यंत भाडे आकारले जात आहे. पुणे-नागपूर या मार्गावरही काही वाहतूकदारांकडून दुप्पट म्हणजे अठराशे ते दोन हजारांपर्यंत भाडेआकारणी करण्यात येत आहे. पुणे-हैदराबाद या मार्गालाही सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे या मार्गावरही तीन हजारांहून अधिक भाडय़ाची आकारणी केली जात आहे. पुणे-अहमदाबादसाठी अडीच हजारांहून अधिक भाडे मोजावे लागत आहे. याच कालावधीमध्ये बसच्या व इतर सर्व टॅक्सची वसुली होऊन वाहतूक व्यवसाय फायद्यात येतो, असे म्हणणे वाहतूकदारांकडून व्यक्त करण्यात येते. मात्र, बसभाडय़ातून लूट केली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. खासगी बसच्या भाडय़ांवरही नियंत्रण आणण्याचा विषय अनेकदा चर्चेला येत असला, तरी त्यावर ठोस काही होत नाही. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून काही निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.