घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सन २०१६ मध्ये असून हे वर्ष महापालिकेने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसार वर्ष’ म्हणून विविध उपक्रमांची साजरे करावे, असा निर्णय महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. या वर्षांत विविध उपक्रम महापालिकेतर्फे राबवले जातील.
डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांत डॉ. आंबेडकर यांचे कार्य आणि विचार समाजातील सर्व स्तरांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रभावी अभियान महापालिकेने राबवावे असा ठराव अविनाश बागवे यांनी दिला होता. त्यावर चर्चा होऊन तो संमत करण्यात आला. या वर्षांत राज्यातील सर्वात मोठे ग्रंथालय महापालिकेने उभारावे तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, इंग्रजी भाषा संभाषण वर्ग, वक्ता मार्गदर्शन शिबिरे आणि अन्य शैक्षणिक उपक्रम राबवावेत, असाही निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. या वर्षांत आंबेडकरी चळवळीतील दलित कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात यावा तसेच डॉ. आंबेडकर यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू करावी असेही निर्णय घेण्यात आले.
विचार प्रसार वर्षांत जे उपक्रम केले जाणार आहेत, त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करावी असेही या ठरावात नमूद करण्यात आले होते.