जलसंपदा विभागाकडून कारवाईचे समर्थन

ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा पाणी उचलणाऱ्या पुणे महापालिकेने ४ ऑक्टोबरला कालवा समितीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. धरणांत पुरेसा पाणीसाठा नसतानाही पालिकेकडून अनियंत्रित पाणीवापर सुरू असल्यानेच खडकवासला धरण येथील पालिकेचे पंप थेट  पोलीस बंदोबस्तात बंद करण्याची कारवाई करावी लागली, असे जलसंपदा विभागाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पंप बंद करण्याबाबत पालिका आयुक्त सौरभ राव यांना माहिती देण्यात आली होती, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

खडकवासला मुठा उजवा कालवा दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची सोमवारी (८ऑक्टोबर) पालिकेत बैठक पार पडली. या बैठकीनंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांना कालवा समितीत ठरलेल्या निर्णयानुसार बुधवारपासून कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई केली, असे जे सांगितले जात आहे त्यात तथ्य नाही, असे जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

खडकवासला धरणसाखळी अंतर्गत ७६ हजार हेक्टर जमीन अवलंबून आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य म्हणून दिलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी पुणे पालिकेला मंजूर केले आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून थेट पद्धतीने तसेच धरणक्षेत्रात पंप हाउसद्वारे बंद जलवाहिनी व पर्वती व लष्कर जलकेंद्रांतून थेट कालव्याद्वारे अशा तीन ठिकाणांहून पालिका धरणाचे पाणी उचलते. बैठकीत ठरल्यानुसार प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याबाबत पालिकेने कार्यवाही केली नाही. त्यामुळे पंपहाउस येथून ११५० दशलक्ष लिटर पाणी सोडल्यानंतर जलवाहिन्या बंद करण्यात आल्या.

प्रतिदिन १६०० दशलक्ष लिटर वापर

शहराची लोकसंख्या ३९.१८ लाख, कटक मंडळे (कॅन्टोन्मेंट बोर्ड) व शेजारील गावे मिळून १.५८ लाख अशी एकूण ४०.७६ लाख लोकसंख्या पालिकेच्या शपथपत्राप्रमाणे आहे. तर, महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण आणि राज्य शासनाने मंजूर केल्यानुसार वाढीव असा एकूण ११.५० टीएमसी पाणीवापर बंधनकारक आहे. तसेच २०१७-१८ मध्ये पालिकेचा पाणीवापर आजवरचा १८.७१ टीएमसी आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०१७, जानेवारी-मार्च २०१८ या पाच महिन्यांत सरासरी प्रतिदिन १६०० दशलक्ष लिटर पाणीवापर आहे. याच कालावधीमध्ये काही वेळा महत्तम पाणीवापर प्रतिदिन १७५० दशलक्ष लिटपर्यंत झाला आहे.