‘युनिक फीचर्स’तर्फे आयोजित पाचव्या मराठी ई-साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलन वाचकाभिमुख व्हावं आणि स्थळकाळाचं बंधन ओलांडून ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवावे, या उद्देशातून हे संमेलन सुरू करण्यात आले आहे.
ई-साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या युनिक फीचर्सचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असताना समाजातील शोषित-वंचितांचं जगणं लेखनातून मांडत मराठी साहित्यविश्वाची कक्षा रुंदावणारे अनिल अवचट या संमेलनाच्या अध्यक्षपदी असावेत हे अर्थपूर्ण आहे. www.uniquefeatures.in या संकेतस्थळावर मार्चअखेरीस हे संमेलन खुले होणार आहे. आपल्या काही निवडक लेखांबद्दल अवचट यांचं म्हणणं दृक-श्राव्य माध्यमातून अनुभवता येणार आहे. अवचट यांची सविस्तर मुलाखतही वाचकांना या संमेलनात वाचता येणार आहे. त्याचप्रमाणे अवचट यांच्याबरोबरीने आणि नंतरही ज्या पत्रकारांनी वास्तवदर्शी लेखन करून मराठी साहित्याचा परीघ विस्तारला, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पुस्तकांबद्दल या संमेलनात वाचायला मिळणार आहे. इंटरनेट माध्यमामुळे सहज-सोपं लेखन झाले असून थेट वाचकांपर्यंत पोहोचणाऱ्या काही उल्लेखनीय ब्लॉग्जच्या िलक्सही या संमेलनात उपलब्ध असतील. वाचकांना त्यांची मते मांडण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि अनुभव मांडण्यासाठी जागा असेल. साहित्य संमेलनाबद्दल परदेशी साहित्यप्रेमींना काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्नही या संमेलनात केला जाणार आहे.
इंटरनेटच्या मायाजालावरील मराठीचे तोकडे अस्तित्व लक्षात घेता ई-संमेलनाच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून मराठीतील दिग्गज साहित्यिकांचे मराठी-इंग्रजी वेब पेज जतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून त्या विभागात यंदा पत्रकार-लेखकांवर भर असेल. पत्रकारिता आणि साहित्य यांचे नाते उलगडून दाखविणाऱ्या या संमेलनात लेखक-वाचकांनी भरभरून सहभाग नोंदवावा, असे आवाहन युनिक फीचर्सने केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 8, 2015 3:15 am