शहरातील कोणत्याही रस्त्यावर यापुढे खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करता येणार नाही आणि खाद्यपदार्थ तयार करून विक्री करताना आढळल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे यापुढे वडा-पाव, भजी, अंडाबुर्जी, अंडाआम्लेट तसेच चायनीजसह अनेकविध पदार्थ तयार करून त्यांची विक्री गाडय़ांवर करण्यास प्रतिबंध राहील.
केंद्र व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मंजुरीनंतर महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शहरात सुरू केली असून त्याची माहिती आयुक्त महेश पाठक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरात वडा-पाव, भजी, बुर्जी आणि चायनीजच्या गाडय़ा मोठय़ा प्रमाणात लागतात. या गाडय़ांवर यापुढे हे पदार्थ तयार करता येणार नाहीत. नागरिकांना स्वच्छ व र्निजतुक अन्नपदार्थ मिळावेत या दृष्टीने गाडय़ांवर पदार्थ शिजवण्यास बंदी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ज्या ठिकाणी गॅसचा वापर केला जातो तसेच अन्नपदार्थ शिजवला जातो, असे पदार्थ गाडय़ांवर तयार करू न देण्याचे धोरण आहे. हातगाडय़ांवर यापुढे या पदार्थाची फक्त विक्री करता येईल. तसेच र्निजतुक असलेले, उत्पादन करून पिशवीबंद केलेले खाद्यपदार्थही विकता येतील. हातगाडय़ांवर फक्त चहा तयार करून त्याची विक्री करता येईल, असे सांगण्यात आले.
या निर्णयाची तातडीने व कठोर अंमलबजावणी शुक्रवारपासून (२० डिसेंबर) सुरू करण्यात येणार असून गाडय़ांवर पदार्थ तयार केले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांना दंड केला जाणार आहे. तसेच असा प्रकार वारंवार होत असल्याचे दिसल्यास परवानाही रद्द केला जाईल, असे सांगण्यात आले.
काय विकता येईल..?
हातगाडय़ांवर, टपऱ्यांवर चहा विकता येईल. तसेच भेळ, पाणीपुरी, ज्यूस विकता येईल. कच्छी दाबेलीची भाजी पावाला लावून विकता येईल. अन्य पदार्थ बाहेरून तयार करून आणून नंतर ते गाडीवर विकता येतील.
काय विकता येणार नाही..?
दाबेली गरम करता येणार नाही. तसेच भजी, वडे, चायनीज पदार्थ, अंडाबुर्जी, अंडाआम्लेट, रगडा पुरी आदी पदार्थ विकता येणार नाहीत.