राज्यातील पहिली ते आठवीची पाठय़पुस्तके आता ई-बुक्सच्या स्वरूपातही उपलब्ध करून देण्यात येणार असून या ई-बुक्सच्या निर्मितीची जबाबदारी बालभारतीकडे देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.
राज्यातील पहिली ते आठवीची पुस्तके आता ई-बुक्स स्वरूपात तयार करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. गेल्या वर्षी पंढरपूर जवळील काही गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाने ‘शिक्षण पंढरी’ हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमामध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅबलेट्स देऊन त्या माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर पहिली ते आठवीच्या सर्वच पुस्तकांचे ई-बुक्समध्ये रूपांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यातील पहिली आणि दुसरीच्या वर्गाचे अभ्यासक्रम हे गेल्यावर्षी बदलण्यात आले आहेत. तर सध्या तिसरी ते पाचवीच्या नव्या पुस्तकांचे काम करण्यात येत आहे. या नव्या पाठय़पुस्तकांचे ई-बुक्समध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाठय़पुस्तकातील पाठांना पूरक अशा छोटय़ा ध्वनिचित्रफितींचीही निर्मिती करण्यात येणार आहे. अॅनिमेशनच्या माध्यमातून पुस्तकातील धडय़ांचे गोष्टीरूप सादरीकरण अशा साहित्याचीही निर्मिती करण्यात येणार आहे. ‘शालेय शिक्षणामधील तंत्रज्ञानाचा वापर वाढावा. शिक्षण अधिक रंजक आणि संवादात्मक व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘शिक्षण पंढरी’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र, या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी विभागाकडे त्यांची साहित्य निर्मिती असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ई-बुक्सच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला,’ असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राथमिक पाठय़पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारती म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडेच या ई-बुक्सची निर्मिती देण्यात येणार आहे. मात्र, ई-बुक्स तयार करण्यासाठी लागणारे तांत्रिक पाठबळ संस्थेकडे नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून खासगी संस्थेला या ई-बुक्सच्या निर्मितीचे काम देण्यात येणार असल्याचे समजते.