महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदानाची आकडेवारी जेमतेम ५० टक्क्य़ांपर्यंत पोहोचली आहे. मतपत्रिका स्वीकारण्याची सोमवारी (१४ मार्च) सायंकाळी सात ही अंतिम मुदत आहे. मतमोजणीनंतर मंगळवारी (१५ मार्च) निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
परिषदेच्या ११ हजार ३३६ मतदारांना मतपत्रिका रवाना करण्यात आल्या होत्या. शनिवारी दुपापर्यंत त्यापैकी जेमतेम ४८ टक्के म्हणजे ५ हजार ४८९ मतदारांनी मतपत्रिका पाठविल्या आहेत. ज्यांना मतपत्रिका मिळाल्या नाहीत अशा ४१० मतदारांनी दुबार मतपत्रिकेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी ३५३ मतदारांना दुबार मतपत्रिका देण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. सुभाष किवडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. मतदाराच्या ओळखीचा पुरावा मतपत्रिकेसोबत जोडणे अनिवार्य करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून मतदारांमध्येही जागृती आली आहे. त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसला असल्याचा दावा परदेशी यांनी केला.
सोमवारी सायंकाळी सात ही मतपत्रिका स्वीकारण्याची अंतिम मुदत असून तोपर्यंत येणाऱ्या मतपात्रिका या मतमोजणीसाठी ग्राह्य़ धरल्या जाणार आहेत. मंगळवारी (१५ मार्च) मतमोजणी सुरू करताना आधी बारकोड सॉफ्टवेअरशी जुळला तरच ते पाकिट मतमोजणीसाठी घेतले जाईल. हा बारकोड न जुळलेल्या मतपत्रिकांचा विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे मतदाराच्या ओळखीचा पुरावा तपासून घेत तो बाजूला करूनच मग पाकिटामध्ये असलेली मतपत्रिका मोजणीसीठी घेतली जाणार आहे. सायंकाळी सहापर्यंत अंतिम निकाल जाहीर होणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.