राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयात पुरेसे शिक्षक आणि पायाभूत सुविधा नसतानाही दोन पाळ्यांमध्ये अभ्यासक्रम चालवण्यात येत आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे नियम डावलून काही महाविद्यालयांमध्ये दोन्ही पाळ्यांचे वर्ग एकाच वेळी चालवण्यात येत आहेत.

राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत. पुरेसे शिक्षक नाहीत म्हणून परिषदेने जून महिन्यात राज्यातील अनेक महाविद्यालयांचे दुसऱ्या पाळीतील अभ्यासक्रम बंद केले होते, तर काही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी केली होती. मात्र या वेळी कागदोपत्री पायाभूत सुविधा आणि शिक्षकसंख्या योग्य प्रमाणात दिसत असल्यामुळे काही महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांना या वेळी परवानगी देण्यात आली. दोन पाळ्यांमध्ये अभ्यासक्रम चालवायचा असेल तर तो स्वतंत्रपणे चालवण्यात यावा अशी ताकीदही या महाविद्यालयांना देण्यात आली. परिषेदेच्या नव्या नियमावलीनुसार दुसऱ्या पाळीतील अभ्यासक्रम हे सायंकाळपासून रात्री नऊ पर्यंत चालवण्यात यावेत. प्रत्यक्षात मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये दोन्ही पाळ्यांचे अभ्यासक्रम हे एकाच वेळी चालवण्यात येत आहेत.

महाविद्यालयांनी अभ्यासक्रम दोन पाळ्यांमध्ये चालवले जात असल्याचे दाखवून प्रवेश केले आहेत. मात्र सकाळी ९ ते रात्री ९ असे बारा तास काम शिक्षक करू शकत नाहीत आणि दुसऱ्या पाळीसाठी स्वतंत्र शिक्षक भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही पाळ्यांचे अभ्यासक्रम एकत्र चालवण्यात येत आहेत. दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही घरी जाण्याची अडचण होत असल्याचे कारणही महाविद्यालयांकडून देण्यात येत आहे.