इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात एका विषयात अनुत्तीर्ण झालेल्या युवकाने मित्रांकडून सातत्याने होणाऱ्या टिंगलटवाळीला कंटाळून टेकडीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना पुण्यात घडली असून सिंहगड पोलीस तपास करत आहेत. शुभम भोसले असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भोसले हा तरुण धायरी परिसरात राहण्यास होता. तो ४ नोव्हेंबर पासून बेपत्ता होता. शुभमच्या कुटुंबीयांनी याची पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांकडून शुभमचा शोध सुरु होता. या दरम्यान रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह रायकर मळा परिसरातील एका टेकडीच्या पायथ्याशी आढळला असून टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.

शुभम हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. मागील वर्षी तो एका विषयात नापास झाला होता. यावरून त्याचे मित्र त्याची सातत्याने टिंगलटवाळी करत. याला वैतागूनच शुभम याने आत्महत्या केल्याची त्याच्या वडिलांनी तक्रार दिली असून या घटनेचा तपास सुरु आहे.