‘धूम्रपानामुळे देशात दरवर्षी ६० लाख नागरिक मृत्युमुखी पडत असून यातील दहा टक्के जणांचा मृत्यू प्रत्यक्ष धूम्रपानामुळे नव्हे, तर धूम्रपानाच्या धुरामुळे होतो. याबाबत जनजागृती केल्यास तब्बल सहा लाख जीव वाचवणे शक्य होईल,’ असे मत कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. शोना नाग यांनी व्यक्त केले.
तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांसंबंधी जनजागृती करण्यासाठी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू मुक्ती दिवस म्हणून पाळण्यात येतो. डॉ. नाग म्हणाल्या, ‘‘फुफ्फुसांचा कर्करोग आणि क्षयरोग यांची लक्षणे समान असल्यामुळे या दोन आजारांत रुग्णांकडून गल्लत केली जाऊ शकते. नियमित केल्या जाणाऱ्या धूम्रपानामुळे तसेच धूम्रपानातून निर्माण होणारा धूर श्वासावाटे घेतल्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो. धूम्रपानाबरोबरच पान, सुपारी, गुटखा असे तंबाखूजन्य पदार्थ जीभ, गाल, ओठ आणि गळ्याच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकतात. तोंडाच्या कर्करोगाचे जगातील ३० टक्के रुग्ण केवळ भारतातच आढळतात.’’
 तंबाखूचे व्यसन न करण्याचे आवाहन
जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त तंबाखूचे व्यसन करणाऱ्यांनी सिगरेट, बिडी, जर्दा, गुटखा, मावा, मशेरी, तंबाखूची पेस्ट, तपकीर यांसारख्या पदार्थाचा किमान एक दिवस तरी त्याग करावा तेसच विक्रेत्यांनीही या पदार्थाची विक्री करू नये, असे आवाहन सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले आहे.
३१ मे रोजी जागतिक तंबाखू निषेध दिन आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठानतर्फे केंद्रीय आरोग्य खात्याकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. तंबाखू, गुटखा, सिगरेट या पदार्थाचा समावेश आमली पदार्थामध्ये करण्यात यावा, तंबाखू शेतीवर बंदी घालण्यासाठी दिर्घकालीन कार्यक्रम आखण्यात यावा, लहान मुलांमध्ये विक्री होऊ नये याकरिता या पदार्थाचे पुडे किमान पाव किलोचे असावेत, गुटख्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सिंथेटिक कातावर बंदी घालावी, राज्य व केंद्र सरकारने व्यसनविरोधी अभियान राबवावे, सार्वजनिक ठिकाणी या पदार्थाच्या सेवनावर असलेल्या बंदीची कडक अंमलबजावणी व्हावी, अशा मागण्या प्रतिष्ठानतर्फे करण्यात आल्या आहेत.