आगामी काळामध्ये कारागृहातील कैद्यांची विविध विषयांवर परीक्षा घेण्यात येणार असून, या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची शिक्षा काही दिवस कमी करण्याबाबतही विचार केला जाईल, अशी माहिती राज्य कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. उपाध्याय यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील कैद्यांना शुक्रवारी तणावमुक्तीचे धडे दिले. त्या वेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली.
कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये डॉ. उपाध्याय यांनी कैद्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात साडेतीनशे कैदी सहभागी झाले होते. आगामी काळामध्ये कारागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षेच्या कालामध्ये कैद्यांनी चांगले वर्तन ठेवले व चांगले कौशल्य दाखविले, तर त्याच्या शिक्षेतील काही दिवस माफ करण्याचा अधिकार कारागृह प्रशासनाला असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले.
कैद्यांना कोणत्या पुस्तकाची गरज असल्यास त्यांनी त्याबाबत प्रशासनाला सांगितल्यास ती पुस्तके त्यांना उपलब्ध करून दिली जातील. पुढील काळात कैद्यांसाठी समुपदेशन शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर परीक्षाही घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. सुमारे तासभर चाललेल्या या कार्यक्रमामध्ये डॉ. उपाध्याय यांनी गीता, कुराण, बायबलमधील अनेक गोष्टी उदाहरणासह कैद्यांसमोर मांडल्या. भुतकाळात काय झाले याचा विचार न करता वर्तमान व भविष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मनावर ताबा ठेवणारा व्यक्तीच वर्तमान व भविष्य चांगले ठेवू शकतो, असा संदेशही त्यांनी कैद्यांना दिला.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2015 रोजी प्रकाशित
कारागृहातील कैद्यांची परीक्षा घेणार
आगामी काळामध्ये कारागृहातील कैद्यांची विविध विषयांवर परीक्षा घेण्यात येणार असून, या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची शिक्षा काही दिवस कमी करण्याबाबतही विचार केला जाईल
Written by बबन मिंडे

First published on: 18-10-2015 at 02:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Examination of prisoner in jail