दरवर्षी एखादा स्थळविषय अभ्यासाला घेत तो चित्रांमधून साकार करणारे प्रसिद्ध कलाकार भास्कर सगर यांनी या वर्षी ‘दक्षिण भारता’चा चित्रवेध घेतला आहे. त्यांच्या या चित्र आविष्काराचे प्रदर्शन उद्यापासून (दि. ३१) रसिकांसाठी खुले होत आहे.
श्री सगर हे दरवर्षी एखादा स्थळविषय निवडून त्याचा वर्षभर शोध घेतात. त्या स्थळांचा शोध, अभ्यास आणि त्यानंतर चित्रांमधून त्यांचे संकलन करण्याचे काम ते करत आहेत. या उपक्रमांतर्गत आजवर त्यांनी पुण्याची वैशिष्ठपूर्ण स्थळे, वास्तू, महाराष्ट्रातील गड-कोट, लेणी, प्राचीन मंदिरे, सागरकिनारे, हंपी शिल्प समूह आदी विषय साकारले. या मालिकेत यंदा त्यांनी संपूर्ण दक्षिण भारत हा विषय निवडला आहे. याअंतर्गत त्यांनी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ राज्यांची भटकंती केली. तिथल्या महत्वांच्या स्थळांचा शोध घेतला आणि रंग-चित्रांमधून त्यांचे सौंदर्य साठवले. याअंतर्गत कर्नाटकातील बदामीचे लेणे, चामुंडा टेकडीवरील भव्य नंदी, बाहुबली येथील गोमटेश्वर, हंपी येथील मंडप, म्हैसूरचा राजवाडा, आंध्रप्रदेशातील लेपाक्षीचे वीरभद्र मंदिर, हैदराबादचा चारमिनार, गोवळकोंडय़ाचा किल्ला, तामिळनाडुतील महाबलीपुरम मंदिर, तंजावरचे बृहद्धीश्वर मंदिर, कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक, केरळचे कोची बंदर आदी स्थळांचा त्यांनी चित्रवेध घेतला आहे. या चित्रांचे प्रदर्शन उद्यापासून (दि. ३१) शहरातील दर्पण कला दालन (पत्रकारनगर, गोखलेनगर) येथे भरवले जात आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. शां. बं. मुजुमदार यांच्या हस्ते होणार आहे. ‘कॅलकॉन’चे संचालक चंद्रशेखर चौगुले हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन ६ जानेवारी पर्यंत रोज सकाळी ११ ते ८ या वेळेत सर्वासाठी खुले राहणार आहे.