राज्यासह तसेच पुणे शहरासह जिल्ह्य़ात संचारबंदी असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे अपेक्षित नाही. मात्र, किराणा माल, औषधे आणणे, वैद्यकीय उपचार आदी अत्यावश्यक सेवांसाठी नागरिक घराबाहेर जाऊ शकतात. अशा अत्यावश्यक प्रसंगी नागरिकांनी काय करावे, याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केली जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी सांगितले.

राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली, तरी अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार आहेत. मात्र, घराबाहेर पडण्यास मनाई असल्याने अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर पडायचे असल्यास नागरिकांची अडचण होणार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी राम म्हणाले,की संचारबंदी असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे अपेक्षित नाही. अत्यावश्यक सेवांसाठी नागरिक घराबाहेर जाऊ शकतात. मात्र, नागरिकांनी विनाकारण वाहनांवर फिरू नये.

संचारबंदीच्या काळात नागरिक अत्यावश्यक वस्तू, औषधे आणण्यासाठी घराबाहेर जाऊ शकतात. तसेच वैद्यकीय उपचारांसाठी नागरिकांना घराबाहेर जाण्याची मुभा असेल. मात्र, पोलिसांनी विचारणा केल्यास ही माहिती नागरिकांना द्यावी लागेल. संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवांबाबत नागरिकांनी काय करावे? यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.