ससून सवरेपचार रुग्णालय व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील १०२ बदली कामगार मंगळवारपासून बेमुदत संपावर गेल्याने तेथील स्वच्छता यंत्रणेवर मोठा ताण पडला. संपावर गेलेल्या कामगारांनी नऊ ते सायंकाळी सहा या वेळात आपल्या मागण्यांसाठी रुग्णालयाच्या आवारातच ठिय्या देऊन आंदोलन केले.
न्यायालयाच्या आदेशानुसार बदली कामगारांना कायम नियुक्ती मिळावी ही या कामगारांची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत ‘काम बंद’ आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून या दरम्यान दररोज सर्व बदली कामगार ससूनच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमून आंदोलन करणार असल्याचे माहिती कामगार प्रतिनिधी ज्योतीराव गायकवाड यांनी सांगितले. या कामगारांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
ससून रुग्णालय, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची इन्फोसिस इमारत या तीन ठिकाणी कामगारांच्या ३८० जागा रिक्त असून या परिस्थितीत बदली कामगारही संपावर गेल्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छता व्यवस्थांवर कमालीचा ताण पडत असल्याचे चित्र आहे. कामगारांच्या अनुकंपा तत्त्वावरील वारसांना कायम नियुक्ती मिळावी, त्यांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा आणि प्रथम नियुक्ती दिनांकापासून कायम नियुक्ती मिळावी या देखील बदली कामगारांच्या मागण्या आहेत.