करोना लसीकरण मोहीम सुरू झाली असून लसीकरणासाठी नावनोंदणीचे फसवे संदेश सायबर चोरट्यांकडून पाठवून फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरट्यांकडून नागरिकांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्यांच्या बँकची गोपनीय माहिती घेऊन फसवणूक केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चोरट्यांकडून पाठविण्यात आलेल्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.

करोना लसीकरणासाठी नावनोंदणी करण्यात येत आहे, अशी बतावणी चोरट्यांकडून केली जाऊ  शकते. आधारकार्ड, बँकखाते, पॅनकार्ड, डेबिटकार्डची माहिती दिल्यास नावनोंदणी करणे शक्य होईल, अशी बतावणी चोरट्यांकडून केली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून सायबर चोरटे सामान्यांना वेगवेगळ्या पद्धतीने गंडा घालत आहेत. परदेशातून महागड्या भेटवस्तू, संकेतस्थळावर जुन्या वस्तूंची विक्री, बँक खाते, मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्याची बतावणी करून चोरटे नागरिकांच्या खात्यातून पैसे लांबवितात. करोना लसीकरणाची मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. लसीकरणाच्या नावाखाली चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी चोरट्यांच्या संदेशाक डे काणाडोळा करावा, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेने केले आहे.

अनोळखी व्यक्तीने केलेला संपर्क, ई-मेल, समाजमाध्यमावरील संदेश तसेच लघूसंदेशाला प्रतिसाद देऊ नये. चोरट्यांना प्रतिसाद दिल्यास त्यात फसवणुकीची शक्यता आहे.

प्रतिसाद देऊ नका

करोना लसीकरणाच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक केली जाऊ शकते. अद्याप अशा प्रकारची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली नसली, तरी यापुढील काळात अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास किंवा त्याने संदेश पाठविल्यास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.